ऑनलाईन टीम / मुंबई :
वसईतील अमाफ ग्लास टफ कंपनीने तब्बल 6 कोटी 17 लाखांची वीज चोरी केल्याची घटना समोर आली आहे. महावितरणच्या भरारी पथकाच्या धाडीत हा प्रकार समोर आला असून, चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसईच्या कामन गाव परिसरातील अमाफ ग्लास टफ कंपनीत मागील 50 महिन्यांपासून वीजचोरी सुरू होती. या कंपनीने जूलै 2017 पासून 6 कोटी 17 लाख 71 हजार 330 रुपये किंमतीची 33 लाख 6 हजार 495 युनिट विजेची चोरी केल्याची माहिती मुख्य कार्यालयाकडून मिळाली. त्यानंतर मुख्य अभियंत्यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने ही कारवाई केली तेव्हा संबंधित ग्राहकाचा जोडलेला वीजभार 674.76 किलोवॅट आढळला. रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कारखान्याच्या वीजवापरात 90 टक्के घट होत असल्याचे समोर आल्यानंतर कंपनीचे भागीदार व सध्याचे वीज वापरकर्ते अब्दुल्ला आझाद हुजेफा व शब्बीर आसिर हुजेफा, जागेचे मालक प्रफुल्ल गजानन लोखंडे व वीजचोरीची यंत्रणा बसवून देणारा अज्ञात व्यक्ती या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वापरकर्त्यांनी वीजचोरी केल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी वलीव पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.