प्रतिनिधी / वसगडे
पलूस तालुक्यातील भिलवडी – वसगडे मार्गावर विकास सोसायटीचे माजी उपाध्यक्ष दिपक पाटील यांच्या शेतालगत असणार्या ‘रेन ट्री’ ची फांदी मध्यंतरी आलेल्या वादळीवार्याने तुटुन लाबकळत आहे. फक्त काहीसा गाभा व सालीवर फांदी टिकून राहिली आहे. फांदी रस्त्याच्या मधोमध वरच्या बाजुला असल्याने ती तुटुन पडल्यास जीवघेणी ठरु शकते. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
निसर्ग सरंक्षण संघटना वसगडेचे सर्फमित्र दिपक परिट यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबधित अधिकारी यांना याबद्दल ५ जुन रोजी व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे फोटोसह कळवून सुध्दा, अधिकार्यांना अडचण सोडविण्यास सवड मिळाली नसल्याचे दिसुन येत आहे. दहा दिवसापुर्वी बांधकाम विभागाला कळवूनदेखील याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशी वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अंकलखोप, माळवडी गटाचे दोन जि.प.सदस्य, पलूस प.स.समितीचे दोन सदस्य, आजी-माजी ग्रा.प.सदस्य यांचा प्रवास याच मार्गावरुन दररोज असतो तरीसुद्धा याकडे डोळेझाक केली जात आहे. तीन वर्षापुर्वी वसगडे – पाचवामैल मार्गावर अति पाण्याने झाड उन्मळून पडुन एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला कायमच अंपगत्व आल्याची घटना घडली असल्याने हि फांदी तोडण्याची मागणी होत आहे.