अत्यवस्थ विद्यार्थिनींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार
प्रतिनिधी/ बेळगाव
नेहरुनगर येथील मॅट्रीकपूर्व विद्यार्थिनी वसतिगृहातील 45 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. यापैकी 20 हून अधिक विद्यार्थिनींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. उर्वरित विद्यार्थिनींवरही उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी रात्री या वसतिगृहातील विद्यार्थिनींना अस्वस्थतता जाणवू लागली. बुधवारी सकाळपासून त्यांची तब्बेत ठिक नव्हती. त्यामुळे दुपारी अधिकाऱयांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील बालरोग चिकित्सा विभागात उपचारासाठी आणले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले.
हा प्रकार नेमका काय आहे? याची माहिती मिळविण्याचे काम पोलीस अधिकारी करीत आहेत. बुधवारी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. या विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे की याला आणखी काही कारणे आहेत, याचा उलगडा झाला नाही. वसतिगृहाचे वॉर्डनने या सर्व विद्यार्थिनींना सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडी विभागात उपचारासाठी नेले होते.
वासंती (वय 14), सुवर्णा (वय 12), लक्ष्मी (वय 12), निकिता (वय 16), सावित्री (वय 15), गौरम्मा (वय 14), कोमल (वय 14), कावेरी (वय 16), आकांक्षा (वय 9) अशी 9 विद्यार्थिनींची नावे आहेत. उपचाराअंती त्यांना वसतिगृहात जावू देण्यात आले आहे.