वार्ताहर/ कराड
दिन दिन दिवाळी गाय-म्हशी ओवाळी… कृषी प्रधान देशात गोधन पूजनाला विशेष महत्व आहे. वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीची सुरूवातच गाय-वासराच्या पूजनाने होते. गुरूवारी कराड शहरासह परिसरात वसुबारसच्या निमित्ताने महिलांनी गाय वासराची मनोभावे पूजा करून गायीला भाकरी व राळयाच्या भाताचा नैवैद्य भरवला. तर गुरूवारी घरोघरी पहिला दिवा लावण्यात आला.
यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्वच सण व उत्सव अत्यंत साधेपणाने व घरगुती पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. मात्र आठ महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता व कोरोनाचा जोर ओसरत असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. कोरोनाचे भय कमी झाल्याने लोक दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने बाजारपेठेतही जिवंतपणा आल्याचे पाहावयास मिळत आहे. जोर ओसरला असला तरी कोरोनाचे संकट संपलेले नाही, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना प्रशासनाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसारच नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेऊन आनंदमय दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दिवाळीची सुरवात वसुबारसने होते. तर याच दिवशी दारात दिवाळीचा पहिला दिवा लागतो. शहरातील महिलांना गाय-वासराची पूजा करता यावी, यासाठी विक्रम पावसकर मित्र परिवाराच्या वतीने सोमवार पेठ, कोट परिसर, शिवाजी सोसायटी, प्रकाशनगर आदी भागात गाय वासरांच्या 11 जोडय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील महिलांनी गायवासरांची मनोभावे पूजा केली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही महिलांनी गाय वासराची पूजा करून नैवैद्य भरवण्यात आला. काही ठिकाणी महिलांनी गाय वासराच्या मूर्तीचे पूजन करून वसुबारस सण साजरा केला.