दिवसेंदिवस, महिनोन्महिने, वर्षानुवर्षे चालणाऱया आणि कथानकाला आगापिछा नसलेल्या कौटुंबिक मालिका ही काही मराठीचीच मिरासदारी नाही. हिंदीत देखील अशी गंमत असते. गेले कित्येक महिने हिंदी मालिकांच्या जगात भाभी हे नातं गाजत आहे. ‘भाभीजी घरपर है’ नावाची मालिका अखंडित चालू आहे. या भाभी ऊर्फ वहिनी आता आणखीन काही महिने गाजत राहतील. कारण नुकतीच त्यांना संजीवनी मिळाली आहे. कोणा हुशार आणि मातब्बर व्यक्तीने (भाभीजीच्या मालिकेला मिळणाऱया प्रसिद्धीचा फायदा उठवण्यासाठी की काय?) पापड कंपनी काढली.
आता यात विशेष ते काय? घरोघरी गृहिणी पापड तयार करतात. घरी करायला वेळ नसेल तर विकत आणतात. पण उपरोक्त बातमीतले पापड असे तसे नाहीत. वेगळेच आहेत. ते बनवणाऱया कंपनीचं नाव आहे ‘भाभीजी का पापड’. कंपनीचं उद्घाटन एका मंत्री महोदयांनी केलं आहे. उद्घाटन करताना त्यांनी या पापडांचं एक आगळंवेगळं रहस्य सांगितलं आहे. हा पापड म्हणे गुणकारी आहे. तो खाणारी व्यक्ती कोरोनावर मात करू शकते.
पापडाच्या या अजब गुणधर्माबद्दल आमच्या मनात शंका नाही. आम्ही व्हॉट्सअप विद्यापीठाचे विनम्र पाईक आहोत. समोर आलेल्या प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवणे आणि ती जगाला सांगणे हे आम्ही जीवितकार्य समजतो. आणि पापडाची बातमी तर काय? व्हॉट्सअप विद्यापीठाच्याही आधी म्हणजे साक्षात मंत्रीमुखातून आलेली बातमी. ती खरी असणारच.
मायबाप सरकारने याआधी आर्सेनिक आल्बमच्या गोळय़ा वाटल्या आणि त्यामुळे तुम्ही आम्ही कोरोनापासून बचावलो. आता इथून पुढे आपलं रक्षण भाभीजी का पापडच करतील हे लक्षात ठेवलं पाहिजे. किंबहुना त्या कंपनीशी करार करून मराठीत ‘वहिनींचे पापड’ आणले पाहिजेत. हे पापड घरोघरी लाटले पाहिजेत, भाजले पाहिजेत आणि तोंडी लावणे म्हणून खाल्ले पाहिजेत. तरच धडगत आहे. नाही तर कोरोनाशी गाठ आहे. एकच शंका आहे. ही बातमी गुप्त ठेवता येईल का? कारण ट्रंप साहेबांना ही बातमी समजली तर ते येतील आणि भारतातले सगळे ‘भाभीजी चे पापड’ उचलून अमेरिकेत नेतील. मग आपल्याला कोरोनावर उपाय म्हणून पुन्हा नवीन औषध शोधावं लागेल.