आंध्रमध्ये चोरीसाठी मंदिराच्या भिंतीला पाडले छिद्र
चोर याच छिद्रात बसला अकडून
वाईट कर्माचे फळ देखील वाईट असते असे म्हटले जाते. आंध्रप्रदेशात ही बाब सत्य ठरली आहे. येथे एका चोराने मंदिरातून दागिने चोरण्यासाठी भिंतीला छिद्र पाडले, परंतु या छिद्रात तो स्वतःच अडकून बसला. मदतीसाठी हाका मारून लोकांना बोलाविल्यावर त्याला रंगेहात पकडण्यात आले.
पापा राव नावाचा चोर आंध्रप्रदेशचा किनारी जिल्हा श्रीकाकुलम येथील जामी यलम्मा मंदिराची खिडकी तोडून आत शिरला आणि देवीच्या मूर्तीवरील दागिने त्याने चोरले, बाहेर पडण्यासाठी त्याने भिंतीला छिद्र पाडले, परंतु या छिद्रातच तो अडकून बसल्याचा प्रकार घडला.
अनेक तासांनंतरही बाहेर पडता न आल्याने त्याने जोरजोरात रडून लोकांना मदतीसाठी बोलाविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तेथे ग्रामस्थ जमा झाले. लोकांनी त्याला छिद्रातून बाहेर काढत पोलिसांच्या स्वाधीन पेले आहे.
अशाचप्रकारच्या आणखीन दोन घटना…
1 दानपेटीत अडकला चोराचा हात
छत्तीसगडच्या कोरबामध्ये मागील वर्षी दोन चोर श्रीसिद्ध वटेश्वर हनुमान शनि मंदिरात चोरी करण्यास गेले होते. टाळे तोडून ते आत शिरले आणि दानपेटीतून पैसे चोरण्याचा प्रयत्न चालविला, परंतु एका चोराचा हात दानपेटीत अडकून बसला. मंदिराच्या पुजाऱयाने दुसऱया दिवशी सकाळी त्यांना पाहिले आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
2 चोरीची रक्कम पाहून हृदयविकाराचा धक्का
मागील वर्षी उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये एका चोराला चोरीची रक्कम पाहून हृदयविकाराचा धक्का बसला. त्याने मित्रासोबत मिळून एका सर्व्हिस सेंटरमध्ये चोरी केली होती. दोघांनी 7 लाख रुपये चोरले होते. आपल्या हाती काही हजार रुपये लागतील अशी त्यांची समजूत होती, परंतु स्वतःच्या डोळय़ांसमोर लाखो रुपये पाहिल्यावर एका चोराला हृदयविकाराचा धक्का बसला होता. या दोन्ही चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.