पालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला बाधा, बावधनमध्ये निकट सहवासातील एक वृद्ध महिला बाधित
प्रतिनिधी/ सातारा
वाई शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या आरोग्याची धुरा पाहणाऱया पालिकेच्या आरोग्य निरीक्षकासच कोरोनाची बाधा झाल्याचे शनिवारी दुपारी उघडकीस आले आहे. त्यास उपचारसाठी डॉ. घोटवडेकर यांच्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे वाई पालिकेच्या कर्मचाऱयांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाई शहरात अफवाचे पेव फुटले आहे. एका प्रतिष्ठीत खाजगी डॉक्टरांनाही कोरोना झाल्याची अफवा चांगलीच रंगत आहे. बावधनमध्येही आढळून आलेल्या बाधित वृद्ध महिलेच्या सहवासातील दुसरी महिला बाधित आढळून आली आहे.
वाई शहरात आरोग्याचे काम करणाऱया पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांस दोन दिवसापूर्वी थंडीताप व घशात खवखवत होते. त्याचा स्वाब घेण्यात आला होता. दुपारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्याच उपचारासाठी वाई शहरातील डॉ. घोटवडेकर यांच्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ या पालिकेचे कामकाज सोमवारी सुरु ठेवणार की बंद याचेच कोडे असून पालिकेच्या कर्मचाऱयांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. दरम्यान, वाईतील जी कोरोना बाधित नगरसेविका होती ती कोरोना मुक्त झाली आहे. शेंदूरजणे येथील 30, 48 वर्षीय पुरुष, बावधन येथील 70 वर्षीय महिला, पसरणी येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. वाई येथील 68 वर्षीय पुरुष बाधीत आढळून आले आहेत. शहरात अफवाचे पेव फुटले असून त्यापैकी एक अफवा म्हणजे शहरातील एका प्रतिष्टीत खाजगी डॉक्टरालाच कोरोना झाल्याची घराघरात चर्चा रंगत आहे. प्रत्यक्षात तसे काही नसल्याचे समजते.