प्रतिनिधी/ वाई
वाई शहरात यावर्षी घरगुती वा कोणतेही गणपती कृष्णा नदीच्या पात्रात विसर्जन करायचे नाही असा फतवा पालिकेच्या वतीने घेण्यात आला होता.ज्या दिवशी घरगुती विसर्जन होते त्याच दिवशी वाई पालिकेने वेळे गावच्या हद्दीत कृत्रिम तळे काढायला सुरुवात केली.ते तळे दोन दिवसात काढून पूर्ण केले आहे.नागरिकांना आवाहन केल्यानुसार नागरिकांनी मूर्ती दान उपक्रमात सहभाग नोंदवला. वाईच्या नगराध्यक्षा सौ.प्रतिभा शिंदे या सतत काम करताना दडपणाखाली असल्याचे जाणवते.इतर चमको नगरसेवकांची नुसतीच लुडबुड सुरू असते, असे काहीसे चित्र वाई पालिकेच्या बाबतीत सुरू आहे. वाई शहर व परिसरातील गणेश भक्त दरवर्षी कृष्णा नदी पात्रात गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतात.यावर्षी कोरोनाची भीती दाखवून व स्वच्छतेच्या दृष्टीने कृष्णा नदी पात्रात विसर्जनाला मनाई करण्यात आली आहे.विसर्जनाच्या सातव्या दिवशी वार्डात मूर्ती दान हा उपक्रम पालिकेच्यावतीने राबवण्यात आला होता.गणेशभक्तांनी गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी मूर्ती दान केल्या.पालिकेने गोळा केलेल्या मूर्ती एका जागी ठेवल्या होत्या. गतवर्षी गोळा केलेल्या मूर्ती एका ठिकाणी तशाच होत्या, असे काही वाईतील नागरिक अजून ही सांगतात.वाई पालिकेने दान म्हणून घेतलेल्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी वेळे गावच्या परिसरातील एक गोशाळा आहे त्या गोशाळे च्या परिसरात मोकळ्या जागेत दोन दिवसांपूर्वी तळे खोदायला सुरुवात केली.तळे खोदून त्यात प्लास्टिक कागद टाकून पाणी भरले.त्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी दस्तुरखुद्द वाईच्या नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे, वाईच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.दरम्यान या कृत्रिम तळ्याबाबत काही चमको नगरसेवकांची नुसतीच लुडबुड सुरू असून नगराध्यक्ष डॉ.प्रतिभा शिंदे यांच्यावर काम करताना दडपण येत असल्याची चर्चा सुरू होती