अपघातामुळे थांबलेल्या अन्य तीन वाहनांना काँक्रीट मिक्सरची धडक
प्रतिनिधी / कणकवली:
महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱया क्रेटा कार चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावर उलटली. या अपघातात कारमधील चालकासह चौघेजण जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान, अपघातग्रस्तांना उपचारासाठी नेणाऱया रुग्णवाहिकेलाही मिक्सर वाहतूक करणाऱया वाहनाने धडक दिल्याने रुग्णवाहिकेचेही नुकसान झाले आहे.
अपघातात कार चालक देवाशीस बनुमलीक खांडगा (36 कांदिवली मुंबई) याच्यासह सौरभ अशोक अगरवाल (34), स्वाती अशोक अगरवाल (39 रा. मुंबई) व तन्मय देवाशीस खांडगा (8) यांना दुखापत झाली. सर्वांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चालकाचा ताबा सुटल्याने सदर कार (एमएच 03 सीव्ही 1153) वागदे डंगळवाडी ब्रिज येथे उलटली. अपघाताची माहिती मिळताच वागदे ग्रामस्थ तसेच ओसरगाव माजी सरपंच बबली राणे यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. दरम्यान अपघात झाल्यानंतर जखमींना घेण्यासाठी थांबलेल्या रुग्णवाहिकेस (एम एच 08 एच 5707) एक मोटारसायकल (एमएच 07 यू 4419) आणि टाटा एसीई टेम्पोला (एमएच 20 सीटी 3192) दिलीप बिल्डकॉनच्या काँक्रीट मिक्सरने (एमपी 39 एच 3303) धडक दिल्याने या वाहनांचेही नुकसान झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्यानंतर डंपर चालकाने कणकवलीच्या दिशेने पोबारा केला होता. रुग्णवाहिका चालक पिंटय़ा जाधव खाली उतरले असल्याने सुदैवाने बचावले. अपघातानंतर घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह कणकवली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम सहकाऱयांसह दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, अपघातानंतर न थांबता निघून जाण्याच्या हायवे ठेकेदार कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही अपघातांच्यावेळी हायवे ठेकेदार कंपनीचे चालक न थांबता पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. pleteDuration