गावात आठ दिवस ‘हरे रामा हरे कृष्णाचा गजर’ : श्रीराम कथेवर आधारित नाटय़प्रयोग : पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला लाभ
वार्ताहर /किणये
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) बेळगाव शाखा व वाघवडे प्रचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वाघवडे गावातील हनुमान मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाची मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
या भागवत सप्ताहामुळे गावात आठ दिवस ‘हरे रामा हरे कृष्णाचा’ गजर झाला. कोरोनाच्या नियमावलीनुसार हा सप्ताह झाला. भक्तमंडळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत होते.
रोज सायंकाळी वैष्णव भजन, प्रवचन व तीर्थप्रसाद असे कार्यक्रम झाले. मागील आठवडय़ाच्या शनिवारी व रविवारी विकेंड कर्फ्यू असल्याने दोन दिवस सप्ताहाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे सप्ताहाची सांगता होण्यास विलंब झाला. व दोन दिवसापूर्वीच या भागवत सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.
सप्ताहामध्ये माधवचरणदास, हरिभजनदास, शंकर अरण्यदास आदींची प्रवचने झाली. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी वैष्णव भजन झाल्यानंतर कृष्णबलराम (श्री गौरणीताई) यांचा अभिषेक करून विशेष पूजा करण्यात आली. सध्याच्या आधुनिक युगात तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहेत. व्यसनामुळे स्वतःसह त्यांच्या कुटुंबांचे देखील नुकसान होते. यामुळे तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता उच्च शिक्षण घ्यावे. याचबरोबर काम-धंदा, नोकरी, शेती प्रामाणिकपणे करावी. यात तुम्हाला नक्कीच यश येईल. यामुळे तुमच्या संसाराचा गाडा अगदी सुरळीत सुरू राहील. आणि हे करीत असतानाच भगवंतांचे नामस्मरणही करावे, असे भद्रसेन प्रभुदास यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.
रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, अशा ग्रंथांचे वाचन करा. यामुळे तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल, असेही भद्रसेन प्रभुदास यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.श्रीराम कथेवर आधारित नाटय़प्रयोग झाला. या नाटय़प्रयोगात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चार भाऊ एकमेकांशी कसे वागतात याचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच वनवास, रावणाने केलेले सीताहरण, राम-हनुमान भेट आणि त्यानंतर सर्व युद्धातील प्रसंग याचे सादरीकरण गावातील कलाकारांनी करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. त्यानंतर महाआरती झाली. आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भागातील भाविकांनी या भागवत सप्ताहाचा लाभ घेतला.