प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथे शिवपुरी रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत आईसोबत पाणी आणण्यासाठी निघालेला चिमुरडा नरसिंग गोविंद जाधव (वय ७) हा जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाला डोळ्यासमोर काळाने हिरावून घेतल्याने आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोविंद रंगाप्पा जाधव (वय ४०, मूळ रा. बारा नंबर पाटी, जिल्हा लातूर, सध्या रा. वाघवाडी, ता. वाळवा) व त्यांच्या पत्नी गिता व तीन मुले हे कुटुंब बाघवाडी येथील शरद भिमराव पाटील यांच्या स्टोन क्रशरवर मोलमजुरीसाठी वास्तव्यासआहे. शुक्रवारी सकाळी चिमुरडा नरसिंग व त्याचे आणखी दोन भाऊ आईसोबत पाणी आणण्यासाठी निघाले होते. दरम्यान आईने लहान व मोठ्या मुलांसोबत रस्ता ओलांडताना समोरून भरधाव वेगाने येणारा टेम्पो क्रमांक एमएच १० सीआर ६९४७ ने नरसिंगला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, तो जागीच ठार झाला. याप्रकरणी वडील गोविंद जाधव यांनी निष्काळाजी पणाने भरधाव गाडी चालवून मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात विरोधात फिर्याद दिली आहे. अर्जुन सदाशिव पाटील(वय ४०, रा.कार्वे, ता.वाळवा) असे ट्रकचालकाचे नाव आहे. अधिक तपासपोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे करीत आहेत.