वार्ताहर/ कराड
वाघेरी (ता. कराड) येथे बंद घर फोडून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व साडेअठरा हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे दोन लाख 27 हजार रुपयांचा ऐवज लांपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत विलास पोपट शिंदे यांनी कराड तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास शिंदे हे हजारमाची येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सेवा बजावत आहेत. सध्या ते कुटुंबासमवेत ओगलेवाडी येथे राहतात. त्यांचे वाघेरी या मूळ गावीही घर आहे. घराच्या वरच्या मजल्यावर त्यांची आई व भाऊ राहतात. विलास शिंदे शुक्रवार 12 रोजी वाघेरी येथे जाऊन घराची साफसफाई करून संध्याकाळी पुन्हा ओगलेवाडी येथे आले होते. येताना त्यांनी कपाट व घराला कुलूप घातले होते. मात्र रविवारी सकाळी घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर विलास शिंदे यांनी वाघेरी येथे जाऊन पाहिले असता अज्ञातांनी त्यांच्या घराच्या दाराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवश केला असल्याचे व घरातील कपाटातील लॉकर उचकटून त्यातील सुमारे पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच अठरा हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम असा सुमारे दोन लाख 27 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. याबाबत कराड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ओगलेवाडीतही दोन घरे फोडण्याचा प्रयत्न
दरम्यान, ओगलेवाडी येथील कल्याण चाळीच्या पाठीमागील बाजूची दोन बंद घरेही फोडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र या ठिकाणी चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. ओगलेवाडी व वाघेरी येथे एकाच रात्री घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे सदाशिवगड विभागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.