शाळांमध्ये वाचकांची संख्याही जेमतेमच : कोपरा वाचनालयेही अडगळीत
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांच्या सामान्यज्ञानात भर पडावी, यासाठी प्रत्येक शाळेत वाचनालये आणि कोपरा वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी दरवर्षी लाखोंचा निधी खर्ची घातला जात असला तरी त्या पुस्तकांचा योग्य विनियोग होत नसल्याचे समोर आले आहे. गतवर्षी शाळा बंद असतानाही जिल्हय़ातील 1442 शाळांमध्ये वाचनालयांवर तब्बल 72 लाखांचा निधी उधळण्यात आला आहे. जिल्हय़ातील सुमारे 98.6 टक्के शाळांमध्ये वाचनालये व कोपरा वाचनालये उपलब्ध आहेत. या वाचनालयांमधील पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. प्रत्यक्षात मात्र ही पुस्तके कुलूप बंद पहावयास मिळतात. विद्यार्थ्यांकडून पुस्तकांची मागणी होत नाही आणि शिक्षकांना वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याबाबत स्वारस्य नाही, अशी स्थिती आहे.
आडातच नाही तर…
मुळात शिक्षकांनी वाचनातून नवे काही शिकून ज्ञानार्जन करावे, हादेखील वाचनालयांचा उद्देश आहे. परंतु शाळेमध्ये सहज उपलब्ध होणारी पुस्तके वाचण्यासही शिक्षकांना वेळ नाही. सरकारकडून अतिरिक्त कामांचा बोजा वाढला आहे. त्यामुळे वाचणार तरी कधी? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केला जातो. एकूणच शिक्षकांमध्येच उदासिनता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढण्याबाबत अपेक्षा बाळगणे व्यर्थच असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
पुस्तके वाचण्यायोग्य हवीत
शालेय वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी वाचण्यायोग्य पुस्तके असायला हवीत. प्रत्यक्षात बालमनाला भावतील, अशा पुस्तकांऐवजी दीर्घकथा, कादंबऱया, अनुभव कथन, आत्मचरित्र, वैचारिक आणि ललित लेख संग्रहांच्या पुस्तकांचाच भरणा वाचनालयांमध्ये अधिक आहे. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सहज अवगत होतील, अशी कॉमिक्स आणि लघु कथांची पुस्तके अत्यल्प आहेत. त्यातही कानडी पुस्तकांची संख्या अधिक असल्याने मराठी भाषिक विद्यार्थी नेहमीच वाचलयांकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसते.
वर्षभरातील अनुदान खालीलप्रमाणे
बेळगाव विभाग
तालुका | शाळा | अनुदान |
बेळगाव शहर | 39 | 1,95,00 |
बेळगाव ग्रामीण | 100 | 5,00,000 |
बैलहोंगल | 57 | 2,85000 |
कित्तूर | 30 | 1,50000 |
खानापूर | 77 | 3,85000 |
रामदुर्ग | 60 | 3,00000 |
सौंदत्ती | 65 | 3,25,000 |
चिकोडी विभाग
तालुका | शाळा | अनुदान |
अथणी | 197 | 9,85,000 |
कागवाड | 61 | 3,05,000 |
चिकोडी | 153 | 7,65,000 |
निपाणी | 96 | 4,80,000 |
गोकाक | 73 | 3,65,000 |
मुडलगी | 114 | 5,70,000 |
हुक्केरी | 139 | 6,95,000 |
रायबाग | 181 | 9,05,000 |
एकूण | 1442 | 72,10,000 |