ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत स्वस्तात रुग्णसेवा देणारे वाडिया रुग्णालय बंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईचे महापौर आणि रुग्णालय प्रशासनच्या बैठकीनंतर रुग्णालयाचे भवितव्य ठरणार आहे.
मुंबईत स्वस्तात रुग्णसेवा देणारे वाडिया रुग्णालय सध्या निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकार आणि महापालिकेकडून मिळणारे अनुदान थकीत आहे. त्यावर महापालिकेने रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयासोबतच्या मूळ करारातील अटी व शर्तीचा भंग केला असल्याचा आरोप ठेवत आज महापौरांसोबत बैठक आयोजित केली आहे. रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे ऐकूनच रुग्णालयाला अनुदान देण्याबाबतचा निर्णय होणार आहे.
या रुग्णालयात पालिकेच्या परवानगीशिवाय खाटांची संख्या वाढवण्यात आल्याचा आरोप पालिका अधिकाऱयांनी केला आहे. तसेच ठरवून दिल्यापेक्षा जास्त प्रमाणात कर्मचारी भरती यावर पालिकेने बोट ठेवले आहे. तर रुग्णालयाला महापालिकेकडून 135 कोटींचे अनुदान येणे असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. तर 20 कोटी रुपयांचेच देणे असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या सर्व प्रश्नांवर आज बैठक होईल, त्यानंतर रुग्णालयाचे भवितव्य ठरणार आहे.