प्रतिनिधी / शिराळा
वाढत्या कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबात तहसील कार्यालय शिराळा येथे आ. मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधी प्रशासनाला आ. नाईक यांनी सुचना दिल्या. या आढावा बैठकीस तहसीलदार गणेश शिंदे , गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपंचायत मुख्याधिकारी योगेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पाटील प्रमुख उपस्थित होते.
आ.मानसिंगराव नाईक म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या. यासाठी शाळा-कॉलेज पंधरा दिवसांसाठी बंद ठेवता येतील का ? यासंबंधी प्रशासनाशी चर्चा केली. बाजार पूर्णपणे बंद न ठेवता शहरातील वेग – वेगळया ठिकाणी सामाजिक अंतर राखून बसण्याची व्यवस्था करावी. शिराळा उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन टाक्या भरून ठेवाव्यात, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषध साठा उपलब्ध करून घ्यावा. 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी.
तालुक्यातील लसीकरणाचा त्यांनी या वेळी आढावा घेतला आणि लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या. एसटी बस सेवा सुरू ठेवत असताना, पुरेशी काळजी घेऊन विना मास्क कोणालाही बस मध्ये प्रवेश देऊ नये, शिवाय गर्दीवर नियंत्रण साठी बस स्थानक परिसरात पोलीस कर्मचारी नेमावा. अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.