केंद्र सरकारचा इशारा – दहा राज्यांना सतर्कतेच्या सूचना, नव्या बाधितांमध्ये वाढ होत असल्याने दक्षता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील चार दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. केरळमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. केरळप्रमाणेच अन्य राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये एकंदर रुग्णांपैकी 75 टक्के नवे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या दहा राज्यांना अधिक सतर्क केले आहे.
सध्या देशात दैनंदिन चाळीस हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. वाढत्या संसर्गामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱया केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्रप्रदेश आणि मणिपूर या राज्यांना अलर्ट करण्यात आले आहे. या राज्यांमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर वेळीच सावधगिरीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांना केल्या आहेत. चाचण्या वाढवण्याची आणि लसीकरणाला वेग देण्याची सूचना आरोग्य सचिवांनी केली आहे. तसेच वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर स्थितीत आणखी बिकट होईल असे सांगण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या योग्य अंमलबजावणीबरोबरच रुग्णांवर योग्य उपचार मिळावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर होम आयसोलेनमधील रुग्णांची योग्य देखभाल करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
जिल्हानिहाय आढाव्याअंती निर्णय
सर्वाधिक संसर्गबाधित राज्यांमधील 46 जिल्हय़ांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर 10 टक्क्मयांहून अधिक आहे. तर 53 जिल्हय़ांमध्ये नव्या रुग्णवाढीचा दर 5 ते 10 टक्क्मयांदरम्यान आहे. मागच्या काही आठवडय़ात ज्या जिह्यात कोरोना रुग्णवाढीचा दर 10 टक्क्मयांहून अधिक आहे, अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी जिल्हानिहाय आढावा घेतल्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
डेल्टा व्हेरिएंट ठरू शकतो जीवघेणा ः ‘डब्ल्यूएचओ’
जगभरातील सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. सर्वांनीच डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्मयता असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणासोबतच सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्यामध्ये फेस मास्क, सोशल डिस्टन्सिंग, योग्य आहार, स्वच्छता आणि गर्दीचे ठिकाण टाळणे या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. जगभरातील 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट या जीवघेण्या कोरोनाच्या प्रकाराचा प्रसार झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केल्यामुळे याचा अधिक प्रसार होण्याआधीच सर्वांनी काळजी घेऊन यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक पातळीवर लसीकरण वाढण्याची गरज
सर्वच देशांनी या वर्षाच्या सप्टेंबरअखेर आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील वर्षीपर्यंत जगभरातील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.