दिवसभरात जवळपास सव्वादोन कोटी लाभार्थींनी घेतला कोरोना प्रतिबंधक डोस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस शुक्रवारी देशभरात कोरोना प्रतिबंधक ‘लसोत्सवा’ने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांवर देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतानाच देशाच्या कानाकोपऱयात लसीकरणाने वेग घेतला होता. दिवसभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल सव्वादोन कोटीहून अधिक जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी देशात भाजपाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. याचदरम्यान लसीकरणाचा नवा विक्रमही रचला गेला. दुपारी 1 वाजेपर्यंत देशभरातील तब्बल 1 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले. हाच आकडा सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 कोटींवर तर रात्री साडेआठ वाजेपर्यंत 2 कोटी 23 लाख 16 हजार 061 या आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. त्यानंतरही नोंदणीप्रमाणे हा आकडा आणखीनच वाढत चालला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासह दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाधान व्यक्त करत सर्व देशवासियांचे विशेष आभार मानले आहेत.
शुक्रवारी दुपारी लसीकरणाचा एक कोटीचा आकडा पार झाल्यानंतर आरोग्यमंत्री मांडविया यांनी ‘आपण दुपारपर्यंत 1 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले असून लसीकरणाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. आपण सर्वजण आज लसीकरणाचा नवा विक्रम रचून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची भेट देऊया’ असे ट्विट केले होते. 17 सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत लस घेणाऱयांचा आकडा 1 करोडच्या पार गेला होता. याचवेळी, दुपारी 2.30 पर्यंत हा आकडा 1.25 कोटींच्या पुढे पोहोचला होता.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर हा दिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा भाजपने आधीच केली होती. या दिवशी देशभरात मेगा लसीकरणाचा विशेष कार्यक्रम चालविण्यात आला. देशभरात या मेगा लसीकरणासाठी भाजपने 6 लाखांहून अधिक स्वयंसेवकांची टीम तयार केली होती. हे स्वयंसेवक इतर नागरिकांना या लसीकरण मोहिमेत सामील होण्यास मदत करत होते. एका दिवसात 2 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे भाजपचे लक्ष्य होते. दिवस अखेरपर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्यात यश प्राप्त झाले होते.
20 दिवसांची जनसंपर्क मोहीम सुरू
पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाने 20 दिवसांच्या देशव्यापी मोहिमेची योजना देखील आखली आहे. ज्याला सेवा आणि समर्पण अभियान असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेत भाजप कार्यकर्ते घरोघरी, विविध कार्यक्रमांद्वारे जनतेशी संपर्क साधतील आणि संवाद साधतील. तसेच सेवाकार्यातही सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. 7 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाला 20 वर्षे पूर्ण होत असल्याने तोपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. त्याचदिवशी भाजप युवा संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केले जाणार आहे.
जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून अभिनंदनाचे संदेश प्राप्त झाले. याचदरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींना 71 लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ पाठवला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी पंतप्रधान मोदींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि देशाचे नेतृत्व करण्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या.
कोरोना लसीचा 71 फूटी लांबलचक केक!
देश आणि जगातील सर्व नेते पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच मोदींच्या वाढदिवसानिमित्त बनवलेला अनोखा केक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. मध्यप्रदेशात भोपाळमधील लालघाटी चौकात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 71 फूट लांबलचक केक कापला. लसीच्या आकारात बनवलेला हा केक आकर्षक होता. तर उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये गुरुवारी भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी 71 दिवे लावले आणि 71 किलो लाडूही अर्पण केले.