दुकान उघडे ठेवून खुलेआम विक्री : कारवाई करण्याची अतिश कांबळेंची मागणी
सातारा : वाढे फाट्यावर शुक्रवारी दुकानाचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून ग्राहकांना दारु विक्री सुरु होती.
सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर वाईन शॉप व परमीट, बिअर बार लायन्सेन्सधारकांना घरपोच पार्सल सुविधेच्या माध्यमातून दारु विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, वाढेफाट्यावर असलेल्या गोल्डन वाईन शॉपमधून दुकान उघडे ठेवून दारु विक्री होत आहे. तिथे होणारी ग्राहकांची गर्दी कोरोना संसर्ग वाढवू शकते. त्यामुळे या दुकानावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत शुक्रवारी आरपीआय रोजगार आघाडीचे अतिश कांबळे व शहराध्यक्ष रोहन रणदिवे वाढेफाटा परिसरात गेले असताना तिथे गोल्डन वाईन शॉपचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून ग्राहकांना दारुची विक्री होत होती. तिथे ग्राहकांची गर्दीही जमलेली होती. त्यावेळी अतिश कांबळे यांनी तेथूनच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना मोबाईलवरुन दारु दुकानाकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळानंतर दुकानदाराने मग जमलेल्या ग्राहकांना थोडीफार विक्री केली आणि दुकान बंद करुन तेथून पळ काढला.
वास्तविक वाईन शॉप, परमिट रुम, बिअर शॉपी यांना ज्यांच्याकडे मद्यपानाचे लायसेन्स असेल त्यांना घरपोच सुविधा देण्याची परवानगी दिलीय. मात्र, वाढेफाट्यावरील गोल्डन वाईन शॉपसह शहरात दुकानदार व परमीटरुम चालक ग्राहकांना दारु विक्री करत आहे. त्यामुळे ग्राहकांची गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन केले जात असून अशा दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी अतिश कांबळे यांनी केली आहे.