3500 कर्मचाऱयांना कमी करण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संकटचा सामना करणारी अमेरिकन ऑनलाईन मॉर्टेगेज कंपनी बेटर डॉट कॉम(Better.com ) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता पुन्हा एकदा कर्मचाऱयांवर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱयांबाबत कोणता निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे.
बेटर डॉट कंपनीने म्हटल्याप्रमाणे आपले काम चालविणे अडचणीचे झाले असून यामुळे जवळपास एक तृतीयांश म्हणजे 3,500 कर्मचाऱयांना कमी करणार असल्याची माहिती आहे. या अगोदर कंपनीने डिसेंबर महिन्यात 900 कर्मचाऱयांना घरचा रस्ता दाखविला होता. त्यावेळी या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. यावर खुप वादही झाले होते.
कंपनीचे सीईओ मूळचे भारतीय असणारे विशाल गर्ग यांनी डिसेंबर महिन्यात क्रिसमसच्या अगोदर झूम ऍपवर बैठक सुरु असतानाच अचानकपणे जवळपास 900 कर्मचाऱयांना नोकरीवरुन कमी केले होते. त्यावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर खूप वाद निर्माण झाला होता. यामुळे सीईओला दीर्घ सुट्टीवर पाठवून दिले होते.