छप्पर दुरूस्तीचा आदेश
प्रतिनिधी /मडगाव
फातोर्डा-मडगाव येथील नेहरू स्टेडियमच्या ‘वेस्ट स्टॅण्ड’ वरील छप्पर रविवारी रात्री आलेल्या वादळी वाऱयाने उडून गेले. यामुळे सुमारे 20 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उडून गेलेल्या छप्पराच्या दुरूस्तीचा आदेश क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिला असून दुरूस्तीच्या कामाला प्रारंभ झालेला आहे.
रविवारी रात्री जोरदार पाऊस व वादळी वारे आले होते. त्यावेळी हे छप्पर उडून गेले. या पूर्वी देखील फातोर्डा स्टेडियमचे छप्पर उडून जाण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी बाबू आजगांवकर हे क्रीडामंत्री होते. छप्पर उडून जाण्याची घटना ही रात्री 10.45 ते 11च्या दरम्यान घडली. हे छप्पर सुमारे 35 वर्षे जुने असून यापूर्वीच ते बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे हे काम सुरु होऊ शकले नव्हते.
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना फातोर्डा स्टेडियमचे छप्पर उडून गेल्याची माहिती मिळताच, त्यांनी छप्पर दुरूस्ती करण्याचा आदेश दिला. मंत्री गोविंद गावडे हे काल सोमवारी क्रीडा खात्याशी संबंधित अन्य बैठकात व्यस्थ राहिल्याने ते फातोडर्य़ात पोचू शकले नाही. आपण पुढील एक-दोन दिवसात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी आलेल्या जोरदार वादळी वाऱयामुळे सासष्टीच्या बऱयाच भागात वृक्षाची पडझड झाली असून त्यामुळे वीज खांब ही कोसळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. कोसळलेले वीज खाब पुन्हा उभे करण्याचे काम वीज खात्याने हाती घेतले होते.