वार्ताहर / जांबोटी
ओलमणी परिसरात सोमवारी दुपारी अचानक झालेल्या वावटळीमुळे (वादळ) प्राथमिक मराठी शाळेच्या खोल्यांच्या छतावरील कौले उडाल्यामुळे शाळा खोल्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही दुखापत झाली नाही.
सोमवारी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास ओलमणी परिसरात अचानक जोराचा वादळी वारा येऊन त्याचे वावटळीमध्ये रुपांतर झाले. सदर वावटळीचा केंद्रबिंदू मराठी प्राथमिक शाळा असल्यामुळे वाऱयाच्या दाबामुळे शाळा-खोल्यांच्या छतावरील कौले उडाली. यावेळी विद्यार्थी वर्गात होते. मात्र शिक्षकांनी प्रसंगावधान राखून सर्व विद्यार्थ्यांना सुरळीतपणे वावटळीमधून बाहेर काढल्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेत शाळा-खोल्यांच्या छतावरील कौले उडून गेल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून शाळा-खोल्या विद्यार्थ्यांना बसविण्याच्या दृष्टीने धोकादायक बनल्या आहेत.
दरम्यान, मुख्याध्यापक पी. आर. गुरव यांनी शाळा खोल्यांची कौले उडून गेल्याच्या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे खानापूरचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांना कळविल्यानंतर यकुंडी यांनी त्वरित कालमणी गावाला भेट देऊन शाळा खोल्यांची पाहणी करून विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी अनुदान मंजुरीचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत जांबोटीचे सीआरपी रमेश गावडे, आय. आर. टी. शंकर कम्मार आदी उपस्थित होते.