मोरजीत महोत्सवात ‘एनजीओ’च्या सहभागाला स्थानिकांचा विरोध , ‘एनजीओ’ प्रमुखांची माघार
मोरजी/ प्रतिनिधी
मोरजी समुद्रकिनाऱयावर बिगर सरकारी संस्थेकडून आयोजित केलेल्या गोवा सागरी कासव जनजागृती महोत्सवाला स्थानिकांनी विरोध दर्शवल्यानंतर वनखात्याकडून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवापासून मोरजी सी टर्टल ट्रस्टला दूर केल्याशिवाय महोत्सवाचे उद्घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतल्यानंतर अखेर ट्रस्टच्या प्रमुख सरिता यांना येथून माघारी पाठवून प्रधान मुख्य वन संरक्षक सुभाषचंद्र यांनी सायंकाळी 6.30 वा. महोत्सराचे उद्घाटन केले.
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या मोरजी सी टर्टल ट्रस्टने सदर महोत्सव आयोजन करण्यास स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. स्थानिकांनी काळे टी-शर्ट घालून निषेध करीत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जोपर्यत या बिगर सरकारी संस्थेच्या प्रमुख या कार्यक्रम स्थळावरून जात नाहीत, तोपर्यंत कार्यक्रम होऊ देणार नाही, असा स्थानिकांनी पवित्रा घेतला. मोरजी समुद्रकिनाऱयावर वनखात्याने हाती घेतलेल्या सागरी कासव संवर्धन मोहिमेला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी स्थानिकांनी सांगितले, मात्र या मोहिमेत कुठल्याही बिगर सरकारी संस्थेला सहभागी करून घेण्यास तीव्र आक्षेप घेतला. अखेर वनखात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी एनजीओच्या विरोधात तापलेले वातावरण शांत करताना मोरजी सी टर्टल ट्रस्टच्या प्रमुख सरिता यांना सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात कार्यक्रम स्थळापासून माघारी पाठवल्यानंतर सायंकाळी 4.30 वा. आयोजित केलेल्या या सागरी कासव महोत्सवाचे प्रधान मुख्य वन संरक्षक सुभाषचंद्र यांच्या हस्ते 6.30 वा. उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य वन संरक्षक संतोषकुमार, मुख्य वनपाल सौरभकुमार, उप वनपाल जेबेस्तीन आदी उपस्थित होते.
यावेळी प्रधान मुख्य वन संरक्षक सुभाषचंद्र म्हणाले की, जैविक विविधतेने गोवा संपन्न आहे. या जैविक विविधतेचे रक्षण करणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. स्थानिकांच्या सहकार्याने मोरजी समुद्रकिनाऱयावर हाती घेतलेल्या सागरी कासव संवर्धन मोहिमेत पर्यावरणप्रेमींनी सहभागी द्यावे. पर्यटक तसेच सागरी कासवाच्या अभ्यासकांना माहिती देण्यासाठी हा महोत्सव सुरू करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या महोत्सवाला अभ्यासक, पर्यटक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याच सहभागाने ही मोहीम आम्ही पुढे नेऊया, असे ते म्हणाले. नोव्हेंबरपासून या किनाऱयावर सागरी कासव अंडी घालण्यासाठी येतील. त्यांनी घातलेली अंडी याठिकाणी सुरक्षित केली जातील. देशी-विदेशी पर्यटकही या ठिकाणी भेटी देणार असल्याने किनारी पर्यटनाला चालना मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
स्थानिकांचा सागरी कासव संवर्धन मोहिमेला पाठिंबाच
वनखात्याने मोरजी समुद्र किनाऱयावर सागरी कासव संवर्धन मोहीम राबविण्यास आमचा विरोध नाही. मात्र कोणत्याही बिगर सरकारी संस्थेला त्यात सहभागी करून न घेता वन विभागाने स्वतंत्रपणे ही मोहीम पुढे न्यावी. मात्र सागरी कासवांचे प्राण वाचवण्यासाठी स्थानिकांच्या रोजीरोटीवर पाय ठेवू नये. कारण सागरी कासव संवर्ध मोहिमेच्या आग्रहासाठी किनारी भागात कायदेशीर शॅक्स चालवणाऱयांना लाखो रुपये दंड ठोठावला जातो. शॅक्स उभारण्यासाठी जाचक अटी घातल्या जातात त्यात मोठय़ा प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ लागते. कोरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने सागरी कासव मोहिमेसाठी शॅक्स, मासेमारी यासारख्या किनाऱयावरील व्यवसायांवर गंडांतर आल्यास आम्ही कसे जगावे ? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहेय. टॅक्सी तसेच मासेमारी व अन्य छोटे मोठे व्यवसाय करून रोजीरोटी कमवणाऱयांच्या पोटावर पाया ठेवू नये. तसे झाल्यास आम्ही त्याचा विरोध करू व त्याचे होणारे परिणामही भोगण्यास आम्ही तयार आहोत, असे स्थानिकांनी सांगितले.
विरोध एनजीओला, कासव संवर्धनाला नाही
किनाऱयावर येणाऱया कासवांचे संवर्धन स्थानिकांनी केले मात्र आता हा एनजीओंचा धंदा झाला आहे. मोरजी सी टर्टल ट्रस्टच्या नावाखाली कुणीतरी येतो. स्थानिकांचे कायदेशीर रोजगार हिरावून घेतो. त्यांना यापुढे यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही या मोहिमेस विरोधाच करू, असे यावेळी सांगण्यात आले. सरकारकडून तसेच खासगी देणग्या मिळवून मौजमजा केली जाते, हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. संबंधित ट्रस्टमध्ये एकही स्थानिक नाही. त्यामुळे आमच्या गावाच्या नावाचा वापर करून पर्यावरणाचे रक्षक म्हणून मिरवणाऱयांना आम्ही अजिबात थारा देणार नाही. असे असले तरी कासव संवर्धनाच्या कामात वन विभागाला अजिबात विरोध करणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी मांडली.
किनाऱयावरील एनजीओचे फलक काढले
स्थानिकांनी मोरजी समुद्रकिनाऱयावर मोरजी सी टर्टल ट्रस्टने लावलेले फलक हटविण्यास वन विभागाच्या अधिकाऱयांना भाग पाडले. स्थानिकांच्यावतीने माजी सरपंच सतीश शेटगावकर, स्थानिक पंचसदस्य पवन मोर्जे, पंचसदस्य विलास मोर्जे, माजी पंचसदस्य आग्नेल डिसोझा, कल्पेश फोंडेकर, आल्बर्ट फर्नाडिस, लुसि डिसोझा, विनोद पेडणेकर, जॉनी रॉड्रिग्स सचिन सप्तजी, गेरी फर्नाडिस, पंडित मोर्जे, अन्थोनी लोबो, दिलीप मोर्जे यांच्यासह अनेकांनी भाग घेतला.
यावेळी मुख्य वनपाल सौरभ कुमार यांनी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार मोरजी सी टर्टल ट्रस्टच्या पदाधिकाऱयांना वगळून कार्यक्रम पार पाडला.