वार्ताहर/ घटप्रभा
नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या मेहुण्याचा भावोजीने कुऱहाडीने वार करून खून केला. यात सासरा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार 31 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गोकाक तालुक्यातील धुपदाळ येथे घडली. रमेश धुंडप्पा वालीकर (वय 35) असे मृताचे तर धुंडप्पा वालीकर (दोघेही रा. हुल्लोळी, ता. हुक्केरी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. धुंडप्पा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी गोकाक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमेश शिवाप्पा मल्लापूर (रा. धुपदाळ) असे संशयित आरीपीचे नाव असून तो फरार झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, गत 10 वर्षांपूर्वी धुपदाळ येथील रमेश शिवाप्पा मल्लापूर याच्याशी हुल्लोळी येथील महानंदा हिचा विवाह झाला होता. त्यांना तीन अपत्येही आहेत. मात्र काही महिन्यांपासून रमेश व महानंदा यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होते. त्यामुळे धुपदाळ येथील पंचमंडळींनी या दोघांमधील वाद मिटवून अनेकवेळा आनंदाने संसार करण्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरही वाद सुरू राहिल्याने महानंदा कंटाळून माहेरी आली होती.
दरम्यान, मंगळवार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी महानंदासह वडील धुंडाप्पा व भाऊ रमेश वाद मिटविण्यासाठी धुपदाळ येथे आले होते. त्यांच्यासोबत हुल्लोळी व धुपदाळ येथील पंचमंडळी व वकील उपस्थित होते. यावेळी चर्चा सुरू असतानाच पुन्हा वादविवाद सुरू झाला. यावेळी रागाच्याभरात रमेश मल्लापूर याने घरातून कुऱहाड आणून मेहुणा रमेश व सासरा धुंडप्पा यांच्यावर वार करुन घटनास्थळावरुन पलायन केले. यावेळी उपस्थित सर्वांनाच धक्का बसला.
उपस्थितांनी तत्काळ जखमी रमेश व धुंडाप्पा यांना उपचारासाठी हलविले. यात रमेशचा वाटेतच मृत्यू झाला. मात्र धुंडप्पा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी गोकाक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मुडलगीचे सीपीआय व्यंकटेश मुरनाळ, घटप्रभाचे पीएसआय हालप्पा बालदंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद घटप्रभा पोलीस स्थानकात झाली असून पोलीस फरार रमेश मल्लापूरचा शोध घेत आहेत.