मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांचे आवाहन
प्रतिनिधी / मडगाव
वायब्रंट मडगाव पॅनलच्या फातोर्डा मतदारसंघातील प्रभाग 7च्या उमेदवार मिलाग्रीना गोमीस यांच्या कार्यालयाचे पॅनलचे अध्यक्ष तथा माजी आमदार दामू नाईक यांच्या उपस्थितीत जलसत्रोत फिलीप नेरी रॉड्रिगीस यांच्या शुभहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मंत्री श्री. रॉड्रिगीस यांनी मिलाग्रीना गोमीस याच भाजप पुरस्कृत वायब्रंट मडगाव पॅनलच्या अधिकृत उमेदवार असून त्यांना मोठय़ा मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर फातोर्डा भाजप मंडळ अध्यक्ष मनोहर बोरकर, उमेदवार मिलाग्रीना गोमीस, प्रभाग 5 च्या उमेदवार दिपश्री कुर्डीकर, प्रभाग 8 चे उमेदवार कामिलो बार्रेटो, माजी मंत्री मामा कार्दोज यांच्या सुकन्या अनिता कार्दोज आणि एसटी समाजाचे नेते ग्रेग डायस उपस्थितीत होते.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करण्यात आली. यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित मतदारासमोर दामू नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गोवा फॉरवर्ड सर्वेसर्वा आणि फातोडर्य़ाचे आमदार विजय सरदेसाई यांच्यावर सडकून टीका करताना त्याच्या अकार्यक्षमतेचा पाढाच उपस्थिता समोर वाचला. फातोर्डा मतदारसंघात आमदार या नात्याने विजय सरदेसाई यांनी एक तरी प्रकल्प आणल्याचेदाखवून देण्याचे आव्हान दिले आणि विकास संबधी आपण समोरासमोर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. मडगाव नगरपालिका एक सक्षम, वायब्रंट आणि विकास भिमूख करण्यासाठी वायब्रंटच्या सर्व 25 ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे मडगाव व फातोडर्य़ातील जनतेला आवाहन केले.
मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांचे सरकार पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या संकल्पनेद्वारे राज्याचा विकासवर भर देत आहेत. गोव्यातील नगरपालिकांना लागणारे सर्व सहाय्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून मडगाव नगरपालिका निवडणुकीत वायब्रंट मडगाव पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. मडगाव शहराची जलवाहिनी साळ नदी ही 45 कोटी रुपये खर्चून सफाईचे काम सुरु केल्याचे सांगितले. आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून मडगाव नगरपालिकेला लागणारे सर्व सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सुरवातीला मंडळ अध्यक्ष मनोहर बोरकर यानी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप नाईक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि शेवटी त्यांनीच आभार मानले.