तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी गेले असता घडला प्रकार : पोलीस नाईक तसेच एक हल्लेखोर गंभीर जखमी
संशयितांकडून यापूर्वीही झाली होती पोलिसांना मारहाण : घरात दगड, शिगा, दांडे असे सापडले साहित्य
प्रतिनिधी / मालवण:
वायरी लुडबेवाडी येथे तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी गेलेल्या मालवण पोलिसांच्या दोन कर्मचाऱयांवर तेथीलच दोन भावांनी खुनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला, तर संशयित युवकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या दुसऱया पथकावरही या संशयित भावांनी हल्ला चढविला. यात दोन्ही बाजूंकडून झालेल्या हाणामारीत पाच पोलीस कर्मचाऱयांना किरकोळ दुखापती झाल्या. संशयित दोन भावंडातील एक गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यातील संशयितांमध्ये मोहन अनंत लुडबे व त्याचा भाऊ विवेक अनंत लुडबे याचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
हल्लेखोर दोन्ही भावंडांना पोलिसांनी कडक बंदोबस्तात येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यात एक युवक, तर पोलिसांना पाहून अधिकच आक्रमक होताना दिसत होता. जखमी पोलीस आणि हल्लेखोरांवर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी तात्काळ उपचार केले.
अचानक हल्ल्याला सुरुवात
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकिगत अशी, वायरी येथील एका विवाहितेने दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी पोलीस नाईक धोंडू जानकर व हवालदार विलास टेंबुलकर हे पोलीस वाहनाने गेले होते. दोघेही पोलीस संबंधित महिलेच्या घरच्या परिसरात पोहोचल्यावर त्यांच्या घराला लागून असलेल्या घरातील दोघा भावंडांनी थेट पोलिसांवर हल्ला चढविला. यातील एका भावाने हातात लोखंडी शिग घेऊन थेट टेंबुलकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जानकर मध्ये आले आणि त्यांनी त्या युवकाला पकडले. त्यावेळी दोन्ही युवकांनी घरातील दांडे, दगड, विटा घेऊन पोलिसांवर हल्ला चढविला. यात जानकर यांनी एका युवकाला पकडून ठेवले होते. यात दुसऱया युवकाने थेट एक विट जानकर यांच्या डोकीवर मारली. यात जानकर यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली. यावेळी टेंबुलकर हे मध्ये पडत त्यांनी हल्लेखोरांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यात टेंबुलकर यांनाही हल्लेखोरांनी धक्काबुक्की केली. दोन्ही पोलिसांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी हल्ला सुरूच ठेवला. नंतर पोलीस गाडीचे चालक रमेश तावडे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. काही क्षणातच पोलिसांची दुसरी गाडी घटनास्थळी दाखल होताच हल्लेखोर घरात पळाले. यावेळी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांनीही हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले.
जखमी पोलिसाला रुग्णालयात हलविले
अन्य पोलीस कर्मचारी मदतीसाठी आल्यानंतर हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धोंडू जानकर यांना गाडीतून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या डोकीला टाके घालण्यात आले. तसेच डोकीवर विट मारण्यात आल्याने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱयांनी दिला आहे. तब्बल पंधरा मिनिटांच्या थरार हल्ल्यात जानकर आणि टेंबुलकर यांनी यशस्वी प्रतिकार केला. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हजर झाले व त्यांनी जखमी कर्मचारी जानकर यांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली.
पुन्हा धुमश्चक्री, पुन्हा हल्ला
जानकर जखमी झाल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी पाठविण्यात आलेल्या पोलीस पथकावरही संशयितांनी हल्ला चढविला. यावेळी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी पूर्ण प्लान करत थेट घरात घुसून दोन्ही संशयितांना घराबाहेर काढले. यावेळी एका युवकाने पुन्हा शिग घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला. अन्य पोलिसांनाही दुखापत केली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी प्रतिकार करीत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. यात पोलीस अधिकारी सचिन पाटील, सिद्धेश चिपकर, हर्षल जायभाय, पोलीस उपनिरीक्षक नरळे, पोलीस कर्मचारी अमित खोत यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
संशयित दोघेही जखमी
पोलिसांवर करण्यात आलेल्या हल्ल्यातील संशयित मोहन अनंत लुडबे व त्याचा भाऊ विवेक अनंत लुडबे हे दोघेही जखमी झाले आहेत. एकाच्या डोकीला, तर एकाच्या कानाला दुखापत झाली होती. एकाला पोलिसांच्या गाडीतून, तर दुसऱयाला बलेरो गाडीतून पकडून उपचारासाठी आणण्यात आले होते. दोघांवरही ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी त्यांचा तिसरा भाऊ भगवान लुडबेही उपस्थित होता.
यापूर्वीही पोलिसांवर झाला होता हल्ला
तीन ते चार वर्षांपूर्वी याच दोन भावांनी पोलीस कर्मचारी वेंगुर्लेकर व महाडिक यांच्यावर अशाचप्रकारे शिगेने हल्ला चढविला होता. आजच्या घटनेमुळे संशयित युवकांकडून यापूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्याची चर्चा पोलिसांत सुरू झाली होती. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी वेंगुर्लेकर हे गंभीर जखमी झाले होते.
संशयितांच्या घरात हल्ल्याचे साहित्य
संशयित लुडबे यांच्या घरात दांडे, दगड, विटा, शिगा असे साहित्य पोलिसांना आढळले. पोलीस पकडण्यासाठी गेल्यानंतर युवकांनी याच साहित्याच्या सहाय्याने पोलिसांवर हल्ला चढविला होता. त्यामुळे घरात सामानापेक्षा हत्यारेच जास्त असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल
मालवण पोलिसांनी संशयित दोन्ही भावांविरोधात सरकारी कामात अडथळा आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येत होता.
हल्लेखोरांवर गुन्हा दाखल पोलीस कर्मचारी डी. बी. जानकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालवण वायरी लुडबेवाडी येथील मोहन अनंत लुडबे, विवेक अनंत लुडबे यांच्यावर मालवण पोलिसांनी भादंवि कलम 307 (34) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक जानकर यांनी दिली आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी तात्काळ मालवणात धाव घेत पोलिसांना झालेल्या मारहाणीबाबत माहिती घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले आहे. पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी हल्लेखोर लुडबे बंधुंबाबत माहिती जाणून घेतली.