एकाचवेळी शत्रूच्या 16 ठिकाणांवर करू शकणार वार
वृत्तसंस्था / जैसलमेर
भारतीय वायुदलाच्या 2204 स्क्वाड्रनमध्ये एमआरएसएएम म्हणजेच मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल यंत्रणेचा समावेश झाला आहे. ही यंत्रणा डीआरडीओ आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीने मिळून विकसित केली आहे. ही यंत्रणा शत्रूची विमाने आणि दिशानिर्देशित शस्त्रांपासून स्वतःच्या भूभागाचे आणि सुरक्षा दलाचे रक्षण करू शकते. डेडिकेटेड रडारच्या मदतीने एकच फायरिंग युनिटप्रमाणे ऑपरेट करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे.
पारंपरिक असो किंवा आधुनिक धोका, अत्यंत लवकर प्रत्युत्तर देण्याची क्षमता या यंत्रणेमध्ये आहे. ही यंत्रणा एकाचवेळी शत्रूच्या विविध 16 लक्ष्यांवर 24 क्षेपणास्त्रs डागू शकते. या सुरक्षा यंत्रणात स्वनातीत क्षेपणास्त्र आहेत. शत्रूच्या लक्ष्याला बाधित करत त्याला नष्ट करण्याच्या दृष्टीने याची निर्मिती करण्यात आली आहे. याचा मारक पल्ला 70 किलोमीटरपर्यंत असला तरीही शत्रूच्या विमानाला 110 किलोमीटर अंतरापर्यंतही लक्ष्य करू शकते. ही यंत्रणा अत्यंत कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी हलविता येते आणि याचमुळे शत्रूला चकवा देण्यास ती सक्षम आहे.
ही क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा ताफ्यात सामील झाल्याने वायुदलाच्या सामर्थ्यात भर पडली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या यंत्रणेचा वायुदलात समावेश केला आहे.