वृत्तसंस्था/ कैरो
भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी हे आज इजिप्तच्या 5 दिवसीय दौऱयावर रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱयामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत कैरोमध्ये होणाऱया इजिप्त वायुशक्ती प्रदर्शन आणि आणि इजिप्त संरक्षण प्रदर्शनात (एडेक्स) भाग घेण्यासाठी वायुदलप्रमुख दौऱयावर जाणार आहेत. वायुदल प्रमुख इजिप्तच्या वायुदलाच्या कमांडरच्या निमंत्रणावर हा दौरा करत आहेत.
एडेक्स इजिप्तच्या सशस्त्र दलांकडून आयोजित करण्यात येते आणि प्रत्यक्ष प्रदर्शन आणि स्थिर सादरीकरणाच्या माध्यमातून भूमी, समुद्र आणि आकाशातील नवे संरक्षण तंत्रज्ञान, उपकरणे आणि प्रणाली यांची ओळख उपस्थितांना करून देत असल्याचे वायुदलाकडून सांगण्यात आले.
वायुदलप्रमुखांचा दौरा इजिप्तच्या सशस्त्र दलांसोबतचे संबंध मजबूत करणारा ठरणार आहे. दौऱयादम्यान ते जगातील अन्य सशस्त्र दलांच्या वरिष्ठ कमांडर्ससोबत चर्चा करणार असल्याचे वायुदलाकडून म्हटले गेले.