प्रतिनिधी/ नागठाणे
सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरातील वारणानगर (लांडेवाडी) येथे दोघे जण कोरोना पोजेटीव्ह सापडल्याने ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे येथून वारणानगर (लांडेवाडी) येथे आलेल्या एकाच कुटुंबातील 67 वर्षीय वृद्ध व त्याचा 27 वर्षीय मुलाचा रिपोर्ट रविवारी रात्री उशिरा पोजेटीव्ह आला.या घटनेने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण गाव मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले असून परिसरातील तीन किलोमीटर परिघात असलेली पाच गावे बफर झोन मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
शुक्रवारी रामनगर (ठाणे) येथून एका खाजगी वाहनाने एकाच कुटुंबातील दोन पुरुष व तीन महिला वारणानगर (लांडेवाडी) येथे आले होते.त्यांचे ग्रामस्थानी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगिकरण केले होते.या कुटुंबातील 65 वर्षीय वृद्ध व त्याच्या 27 वर्षाच्या मुलाला ताप व घश्याचा त्रास जाणवू लागल्याने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकायांनी शनिवारी या दोघांच्या घश्यातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते.रविवारी रात्री उशिरा या दोघांचेही अहवाल पोजेटीव्ह आले.
सोमवारी सकाळपासूनच आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.प्रशासनाने तात्काळ वारणानगर (लांडेवाडी) गाव मायक्रो कन्टेंटमेंट झोन केले तर परिसरातील खोडद, निसराळे,खोजेवाडी, जावळवाडी व वेणेगाव ही तीन किलोमीटर परिघातील गावे बफर झोन म्हणून जाहीर केली.कुटुंबातील इतर सदस्यांचे घश्यातील स्त्रावांचे नमुने सोमवारी उशिरा तपासणीसाठी पाठविण्यात आले.जिल्हाधिकारी शेखर सिंह,सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला,तहसीलदार आशा होळकर,गटविकास अधिकारी संजय ढमाळ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दा.गुं. पवार,नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.जे .कांबळे,नांदगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.पी.सातपुते,डॉ.एम.पी.रायबोळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.
मोठा मुलगाही जर्मन रिटर्न
या कुटुंबातील मोठा मुलगा जर्मनी येथे होता.मार्च महिन्यात तो भारतात आला.तो थेट गावी आल्यानंतर गावाने त्याचे त्यावेळी विलगिकरणही केले होते.त्याची मुदत संपल्यानंतर व तो ठीक असल्याने त्यावेळी गावाने सुटकेचा निःश्वास टाकला होता.मात्र आता त्याच्याच घरातील दोघे कोरोना पोजेटीव्ह सापडल्याने गाव चांगलेच हादरले.आता या मोठय़ा मुलाचीही तपासणी होणार असून पुन्हा एकदा त्याला विलगिकरणाला सामोरे जावे लागणार आहे.कुटुंबातील कोरोनाग्रस्त मुलगा हा ठाणे येथे होमगार्ड मध्ये असल्याचे समजते.