प्रतिनिधी / कोल्हापूर
चार वर्षांपुर्वी घडलेल्या 9 कोटी 18 लाख रूपयांच्या वारणा चोरी प्रकरणातील फरारी संशयित सहायक फौजदार शरद शंकरराव कुरळपकर (वय 59, रा. सध्या आनंद अपार्टमेंट, एस. टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली) याला चार वर्षांनी शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत 6 मार्च 2016 रोजी 6 कोटी 18 लाखांची पहिली चोरी झाली होती. या चोरीचा तपास कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केला होता. त्यानंतर 9 मार्च रोजी तपासाच्या नावाखाली 3 कोटींची दुसरी चोरी झाली होती. या प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलीस कुलदीप कांबळे, दीपक पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी संशयित सहायक फौजदार शरद कुरळपकर वगळता इतरांना अटक झाली आहे.
वारणा चोरी प्रकरणातील संशयित शरद कुरळपकर हा चार वर्षे फरार होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेसह, राज्य गुन्हा अन्वेषण शाखाही त्याचा शोध घेत होती. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार वर्षानंतर फरार कुरळपकरला अटक केली. वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत मार्च 2016 मध्ये झालेल्या 9 कोटी 18 लाखांच्या चोरी प्रकरणी दुसऱया गुन्हय़ात संशयित सुरज चंदनशिवे, मैनुद्दीन मुल्ला, शंकर पाटील याच्यासह आठ आरोपी आहेत. या चोरी प्रकरणातील कुरळपकर वगळता अन्य संशयितांना अटक झाली होती. फक्त शरद कुरळपकर हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. चार वर्षांनंतर शुक्रवारी त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली.