तब्बल २५०० कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
वारणानगर / प्रतिनिधी
वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील वारणा दूध संघामार्फत कोल्हापूर येथील सिध्दीविनायक नर्सिग होमच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कर्मचारी वैद्यकीय तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये संघातील तब्बल २५०० कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ ते १९ डिसेंबर या कालावधीमध्ये कर्मचारी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर मोफत घेण्यात आले. प्रारंभी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या प्रतिमेचे पूजन व शिबीराचे उद्घाटन संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते झाले.
वारणा दूध संघ व संलग्न संस्था असलेल्या सावित्री औद्योगिक महिला संस्था,अमृत कामगार सोसायटी,दूध -साखर वहातूक संस्थातील कर्मचाऱ्यांची अत्याधुनिक उपकरणाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली कर्मचाऱ्यांना आरोग्याबद्दल सुयोग्य असे मार्गदर्शन देखील करण्यात आले. कोल्हापूर सिद्धिविनायक नर्सिंग होमचे डॉ. संजय देसाई, डॉ.संदीप पाटील व इतर टिमने दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी संघाचे पर्सोनल मॅनेजर बी.बी.चौगुले, मान्यवर आदी उपस्थित होते.