राज्यातील 24 जागा लढविणार सुभासप
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत आघाडी करत मैदानात उतरलेला सुहेलदेव भारतीय समाज पक्ष 24 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे. सुभासप वाराणसीच्या 8 पैकी 2 जागा शिवपूर आणि अजगरामध्ये निवडणूक लढणार आहे. शिवपूरमध्ये स्वतः ओमप्रकाश राजभर उभे राहणार आहेत. या मतदारसंघात सध्या योगी मंत्रिमंडळाचे सदस्य अनिल राजभर आमदार आहेत.
आघाडीच्या अंतर्गत वाराणसीमध्ये अजगरा आणि शिवपूर हे दोन मतदारसंघ मिळाले आहेत. दोनही मतदारसंघात छडी चिन्हावर निवडणूक लढविली जाणार आहे. या जागांवरील उमेदवार लवकरच घोषित केले जातील. शिवपूरमधून ओमप्रकाश राजभर निवडणूक लढवू शकतात. 3-4 दिवसांमध्ये उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे विधान सुभासपचे प्रवक्ते शशिप्रताप सिंह यांनी केले आहे.
याचबरोबर उर्वरित जागांवर आघाडीच्या उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देण्यात येईल. सरकार स्थापन झाल्यावर 300 युनिट वीज गरीबांना मोफत देण्यात येणार आहे. 6 महिन्यांच्या आत जातीय जनगणना सुरू करण्यात येईल. सरकार आल्यास शिक्षण अनिवार्य करू. महिला पोलीस स्थानकही सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱयांसाठी खतांवर अनुदानाची व्यवस्था करत स्वस्त तसेच किमान शुल्कात सिंचनासाठी वीज देण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. हवाई चप्पल वापरणाऱयांना विमानातून प्रवास घडविण्याच्या नावावर भाजपने फसविले आहे. 10 मार्चपर्यंत भाजपचे उच्चाटन निश्चित आहे. कोरोना काळात भाजप सरकारने गोरगरीबांना ज्याप्रकारे पायी चालवून मारण्याचे काम केले, त्याचप्रकारे जनता त्यांना पायी चालण्यास भाग पाडत आहे. सध्या गृहमंत्री सर्व पायी फिरत आहेत, घरोघरी हात जोडत असल्याचे विधान सुभासपच्या प्रवक्त्याने केले आहे.