प्रतिनिधी / कराड :
कराड तालुक्यातील वारूंजी येथील एका घरात बालकासह महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी खळबळ उडाली. दोघांचेही मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आले असून, त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
ते वारूंजी येथे भाड्याने वास्तव्यास आहेत.
घटनास्थळावरील माहितीनुसार, वारूंजी येथील सत्यजीत पतसंस्थेच्या पाठीमागील परिसरातील एका मंगळवारी सकाळी सुशिला सुनील शिंदे (वय 35) विराज निवास गायकवाड (2) नावाच्या महिलेसह बालकाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी येत होती. हा प्रकार स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सांगितला. पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या महिलेचा व बालकाचा खून झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्या दृष्टीने तपासाची चक्रे सुरू आहेत. मृत महिला व बालकाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुना आहेत. त्यामुळे त्यांचा खून करून संशयित पसार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेमुळे वारूंजी परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाची पाहणी करून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.