प्रतिनिधी / बेळगाव
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीची बेळगाव शाखा, मराठी टीचर्स टेनिंग कॉलेज यांच्यावतीने जानेवारी महिन्यात राजमाता जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त घेतलेल्या वार्तांकन स्पर्धेचा बक्षीस समारंभ बुधवारी पार पडला. टीचर्स टेनिंग कॉलेज येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यंगचित्रकार जगदीश कुंटे उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्या हेमलता परूळेकर, किशोर काकडे होते.
यावेळी कुंटे म्हणाले, टीव्हीसारख्या सामाजिक माध्यमांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. पत्रकारितेसाठी धाडस, भाषा प्रभुत्व, घटनेच्या दोन्ही बाजू तपासण्याची वृत्ती आवश्यक असल्याचे सांगितले. मालिका नव्हे तर बातम्या ऐका व पहा, असे आवाहन त्यांनी केले. निखिल नरगुंदकर यांनी हाडाचा शिक्षक कसा असावा, याबद्दल विचार मांडले.
किशोर काकडे यांनी केंद्रांच्या उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत 1) श्वेता उसीनकर, 2) आशा चापगावकर, 3) अंकिता बेनके यांनी बक्षीस मिळविले. सानिका पाटील, संजीवनी पाटील, नेहा नाईक, मंदिरा मुरगोड, कल्पना केसरकर यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली. प्राचार्या हेमलता परूळेकर यांनी स्वागत केले. व्ही. पी. महाजन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एम. के. पाटील यांनी आभार मानले. केशव कुलकर्णी यांनी प्रार्थना सादर केली.