लाखोंची नुकसानी, प्रवाशांची सुदैवाने सुटकासंभाव्य अनर्थ टळला
वाळपई प्रतिनिधी
वाळपई येथे धावत्या कदंबा बसला अचानकपणे आग लागल्यामुळे कदंबा ( जीए 03, एक्स 246) बसेसचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने सदर बसमध्ये असलेल्या प्रवाशानी प्रसंगावधान राखून आपली सुटका करून घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की, सत्तरी तालुक्मयातील झर्मे गावातून पणजी याठिकाणी जाण्यासाठी नियमितपणे कदंबा धावत असते. शनिवारी सकाळी झर्मे गावातून सकाळी सुटलेली कदंबा बस वाळपई शहरांमध्ये आली असता शहरातून पणजी याठिकाणी जात असता वाळपई शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर सरकारी सामाजिक रुग्णालयासमोर अचानकपणे कदंबाच्या दर्शनी भागामध्ये आगीचा लोळ येत असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती ताबडतोब कदंबाच्या चालकाने कदंबा बसमध्ये असलेल्या प्रवाशांना दिल्यानंतर प्रवाशांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब बसमधून उतरून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर चालक व इतरांनीही बसमधून आपली सुटका करून घेतली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. ही घटना सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
यासंदर्भात माहिती वाळपईच्या अग्निशामक दलाच्या यंत्रणेला देण्यात आल्यानंतर जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यात महत्त्वाचे योगदान दिले. यामुळे जवळपास लाखाच्या आसपास बसेसचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार या आगीचे निश्चित कारण समोर आलेले नाही, मात्र शॉर्टसर्किटच्या माध्यमातून सदर आग लागण्याची शक्मयता आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात घटनास्थळी धाव घेऊन एकूण प्रकार पाहिला.