बंदोबस्त करण्याची मागणी ; विद्यार्थी, शिक्षक व पालकांना धोका
वाळपई : वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या संपर्क रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून गव्याचा वावर वाढलेला आहे. यामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती अशी की वाळपई जवाहर नवोदय विद्यालयात जाण्यासाठी जवळपास एक किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो. सदर रस्ता जंगलातून गेलेला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या भागामध्ये एका गव्याचा वावर वाढू लागलेला आहे. सातत्याने सदर गवा येजा करणाऱ्या नागरिकांना दृष्टीस पडतो. यामुळे कोणत्याही क्षणी त्यांच्याकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. आज जवाहर नवोदय विद्यालयात जाणाऱ्या एका पालकाच्या नजरेस सदर गवा पडल्यामुळे खळबळ निर्माण झालेली आहे. सदर विद्यालयात मोठ्या प्रमाणात मुले शिकतात. यामुळे सातत्याने पालक व नागरिक या विद्यालयांमध्ये ये-जा करीत असतात. वनखात्यांनी ताबडतोब दखल घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.