प्रतिनिधी / सोलापूर
वाळू चोरी प्रकरणात अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणारा पोलीस कर्मचारी विकी गायकवाड याला अखेर विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडल्या होत्या. त्या सोडून दिल्या प्रकरणी पोलिस कर्मचारी विकी गायकवाड याला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बडतर्फ केले आहे. त्याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सापळा करूच १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यास अटक केली. १७ रोजी त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
वाळू चोरी प्रकरणी पोलिस कर्मचारी विकी सुभाष गायकवाड यांच्यावर ८ ऑगस्ट रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत होते. ऑगस्ट पासून आत्तापर्यत त्यांचा पत्ता लागत नव्हता. अखेर पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये १६ रोजी शांती चौक, राघवेंद्र टॉवर येथे सापळा लावला. खाजगी कार घेऊन कोणी कार मध्ये तर कोणी दुचाकीवर बसून लक्ष लावून बसले होते. अखेर २५ मिनिटाच्या प्रतिक्षेनंतर विकी गायकवाड दुचाकीवरून चौकात आला आणि येताच पोलिसांना त्याला क्षणाचाही विलंब न लावता सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अटक केली. यानंतर १७ ऑक्टोबर रेाजी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने १९ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. अटकेची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे, पोलिस उप निरीक्षक बेंबडे, पोलिस हवालदार सुरवसे, पोलिस नाईक खुने, पोलिस कॉन्स्टेबल माळी, साळुंखे, वसेकर आदींनी पार पाडली. या खटल्यात सरकार तर्फे अँड. पंडित जाधव यांनी काम पाहिले.