चिपळुणात संचारबंदीत वाळू माफियांचे थैमान, महसूलची प्रथमच थेट धडक कारवाई
वार्ताहर/ चिपळूण
संचारबंदी असतानाही चिपळुणात वाळू माफियांनी थैमान घातले आहे. नियम धाब्यावर बसवून वाशीष्ठी नदीत बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱयांविरोधात महसूलने धडक कारवाई करताना तब्बल 9 बोटी नदीत बुडवल्या. गुरूवारी रात्री वाळू माफियांविरोधात झालेली आजपर्यंतची तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामे ठप्प असून महसूल प्रशासन व पोलीस यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या कामात गुंतली आहे. याचाचा फायदा उठवत वाळू माफियांनी वाशिष्ठी नदीसह खाडीमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केला आहे. अशा व्यावसायिकांविरोधात वाळू जप्तीसह दंडात्मक कारवाई व गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. त्यामुळे अवैध वाळू उत्खननाला चाप बसेल अशी आशा असतानाच गुरुवारी पुन्हा अनधिकृत वाळू उत्खननाचा नवा प्रकार उघडकीस आला
संचारबंदी असतानाही गोवळकोट परिसरात बेकायदा वाळू उपसा होत असल्याची ओरड सुरू होती. याची दखल घेऊन प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, चिपळूण मंडल अधिकारी यू. आर. गिज्जेवार, आर. पी. मोहिते, जे. पी. क्षीरसागर यांचे पथक गुरुवारी संध्याकाळी 5.30 ाच्या सुमारास गोवळकोट, कालुस्ते आदीठिकाणी वाशिष्ठीकिनारी गस्त घालत होते. यावेळी गोवळकोट नदीत बेकायदा वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे महसूल विभागाचे पथक बोटीमधून वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी निघाले. अधिकाऱयांची बोट आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच कामगारांनी बोटी तेथेच सोडून पोबारा केला. महसूल विभागाचे अधिकाऱयांनी या बोटींची तपासणी केली असता 9 बोटींमध्ये प्रत्येकी सुमारे 2 ब्रास वाळू आढळून आली.
अधिकाऱयांनी याबाबत प्रांताधिकारी पवार व तहसीलदार सूर्यवंशी यांना माहिती देताच दोन्ही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ झाला तरी कोणीही त्या बोटींची मालकी सांगण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे दंडाची कारवाई कोणावर करायची तसेच गुन्हा कोणावर दाखल करायचा, असा पेच निर्माण झाला होता. शेवटी अशा बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱयांना अद्दल घडवण्यासाठी अधिकाऱयांनी त्या 9 बोटी वाळूसह खाडीत बुडवत प्रथमच थेट कारवाई केली. सुमारे सात तास ही कारवाई सुरु होती. महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.