वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकन क्रिकेट संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वासची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लंकन क्रिकेट मंडळाने शुक्रवारी केली आहे. लंकेचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात विंडीजच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयासाठी लंकन गोलंदाजांना वासचे मार्गदर्शन लाभणार आहे.
लंकन क्रिकेट संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड सॅकेर यांची यापूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. पण काही वैयक्तिक समस्येमुळे सॅकेर यांनी आपले हे पद सोडल्याने त्यांच्या जागी वासची नियुक्ती लंकन क्रिकेट मंडळाने केली आहे. 2009 साली वासने आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती. वासने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 111 कसोटीत 355 बळी घेतले आहेत. लंकन क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱयात दोन कसोटी, तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. लंकेच्या विंडीज दौऱयाला 3 मार्चपासून अँटिग्वा येथे प्रारंभ होणार आहे. हे सर्व सामने बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळविले जाणार आहेत.