मुरगावच्या महिला काँग्रसचे मिलिंद नाईक याना आव्हान
प्रतिनिधी /वास्को
मुरगावमध्ये घडलेले वासनाकांड आमदार मिलिंद नाईक यांनी खोटे असल्याचे सिध्द करावे अन्यथा आम्ही ते खरेच असल्याचे सिध्द करून दाखवतो. आमदारांनी वासनाकांड खोटे असल्याचे वास्कोतील ग्रामदैवतासमोर उभे राहून आणि श्रीफळावर हात ठेवून सांगावे. आम्ही देवासमोर उभे राहून ते खरेच असल्याचे सांगू. ऐवढे शक्य नसल्यास मिलिंद नाईक यांनी कार्यकर्त्यांसह व पाठीराख्यांसह एखादय़ा सभागृहात उपस्थित राहावे. आम्ही त्यांच्यासमोर वासनाकांडाचे सर्व व्हिडियो, ऑडियो, वॉटस्ऍपवरील चर्चा मोठय़ा पडदय़ावर प्रदर्शीत करू. हिंमत असल्यास आमदारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आव्हान स्विकारावे असे आव्हान मुरगावमधील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार मिलिंद नाईक यांना दिले आहे.
भाजपाने मिलिंद नाईक यांना वासनाकांडाचे आरोप असूनही पुन्हा उमेदवारी दिल्याने मिलिंद नाईक यांचे समर्थक वगळता लोकांमध्ये तीव्र संताप पसरलेला आहे. भाजपाने मिलिंद नाईक यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे पडसाद उमटू लागले आहेत. सामाजीक माध्यमावर या विषयावरून बराच खदखद चालू आहे. त्यामुळे वासनाकांडाचे प्रकरण भाजपावर शेकण्याची शक्यता त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून व्यक्त होऊ लागलेली आहे. भाजपाने मिलिंद नाईक यांना त्यांच्यावर आरोप असूनही पुन्हा उमेदवारी दिल्याने आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती मुरगावमध्ये निर्माण झालेली असून विरोधी काँग्रेस पक्षाने हा मुद्दा लावून धरलेला आहे.
महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिलिंद नाईक यांना दिले आव्हान
मुरगावच्या नगरसेविका श्रध्दा आमोणकर, योगिता पार्सेकर, माजी नगराध्यक्षा भावना भोसले, मुरगाव काँग्रेसच्या महिला गट अध्यक्ष सिमा बेहरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार मिलिंद नाईक यांच्यावर वासनाकांड प्रकरणी जोरदार आरोप असून त्यांना भाजपाने कसलीही चाड न ठेवता उमेदवारी बहाल केल्याबद्दल संतापही व्यक्त केला. नगरसेविका श्रध्दा आमोणकर म्हणाल्या की, मंत्रीपदाचा दुरूपयोग करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुराव्यांसह पोलीस तक्रार करूनही तपास झाला नाही. कुणाचीही साधी जबानीसुध्दा न घेता हे प्रकरण बंद करण्यात आले आणि पोलिसांनी त्यांना क्लिन चिट दिली. उमेदवारी देण्यासाठीच हे नियोजन करण्यात आलेले आहे. पोलिसांनी तपास बंद केला म्हणून प्रवासनाकांडाचे प्रकरण खोटे ठरणार नाही. आमदार मिलिंद नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा वासनाकांड प्रकरण खोटे असल्याचा दावा असल्यास त्यांनी मुरगावच्या महिला काँग्रेस कार्यकर्त्या देत असलेले आव्हान स्विकारावे. वास्कोतील ग्रामदैवत दामोदराच्या सालात उभे राहून श्रीफळावर हात ठेवून ते वासनाकांड खोट असल्याचे सांगावे. खरे असल्याचे सांगण्याची आमची तयारी आहे. हे शक्य नसल्यास मिलिंद नाईक यांनी आपले कार्यकर्ते आणि पाठीराख्यांसह एखादय़ा हॉलमध्ये उपस्थित राहावे. वासनाकांडाचे व्हिडियो, ऑडियो व जो काही पुराव्यांचा दस्तावेज आहे, तो आम्ही पडदय़ावर प्रदर्शीत करू आणि वासनाकांड खरेच असल्याचे सिध्द करू. हे महिलांचे आव्हान असून हिंमत असल्यास मिलिंद नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आव्हान स्विकारावे असे आव्हान पत्रकार परिषदेत श्रध्दा आमोणकर यांनी दिले. येत्या सोमवारी दुपारी 12.30 वा. पर्यंत मिलिंद नाईक यांची मंदिरात येण्याची वाट पाहण्यात येईल असेही आमोणकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षातर्फे वासनाकांड प्रकरण न्यायालयातही मांडणार असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली.
मतदारांनी दबावाला बळी पडू नये, महिलांच्या सुरक्षेचा विचार करावा
आमदार मिलिंद नाईक निर्दोष आहेत तर त्यांनी आतापर्यंत तोंड का उघडलेले नाही. आरोप का नाकारले नाहीत. त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला, संकल्प आमोणकर यांच्याविरूध्द अब्रनुकसानीचा दावा का घालण्यात आला नाही असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. सत्या काय ते लोकांसमोर आलेलेच आहे. आमदार मिलिंद नाईक वासनाकांडात गुंतलेले आहेत. मतदारांनी आणि महिलांनी गंभीरपणे विचार करावा व ते पुन्हा निवडून येणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांच्या सुरक्षेचा विचार करावा. मुरगावला आज कलंक लागलेला असून हा कलंक पुसून काढण्यासाठी सत्याच्या बाजुने राहण्याची गरज आहे. महिलांनी घाबरू नये व दबावाला बळी पडू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. नगरसेविका योगिता पार्सेकर, माजी नगराध्यक्ष भावना भोसले, काँग्रेसच्या महिला गट अध्यक्ष सिमा बेहरे तसेच सरोज मांदेकर या महिलांनीही पत्रकार परिषदेत आमदार मिलिंद नाईक यांच्यावर आरोप केले.