प्रतिनिधी / वास्को
कोरोना काळामुळे वास्कोतील अडलेली विकास कामे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करू असे आश्वासन मुख्य्मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. मुक्तीच्या साठ वर्षांनिमित्त विविध विकास प्रकल्प आणि मानवी विकास योजना राज्य सरकार मार्गी लावणार असून हा विकास समाजातील शेवटच्या स्तरावरील नागरिकापर्यंत पोहोचवणार आहे. मुरगावच्या जनतेनेही त्यासाठी भाजपाला साथ द्यावी. भाजपाचे उमेदवार निवडून आल्यास विकास साध्य करण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री काल गुरूवारी संध्याकाळी पालिका निवडणुक प्रचारानिमित्त वास्कोत आले होते. त्यांनी विविध प्रभागांमध्ये भाजपा उमेदवारांच्या समर्थनात कोपरा सभा घेतल्या व नागरिकांना भाजपा समर्थक उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री वास्कोतच होते. सर्व प्रथम त्यांनी वास्कोतील हॉटेल एच.क्यू मध्ये आमदार कार्लुस आल्मेदा व पालिका निवडणुकीतील वास्को मतदारसंघातील उमेदवारांच्या उपस्थितीत त्यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी दोन्ही जिल्हा पंचायती भाजपाने बहुमताने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता भाजपासोबत आहे हे सिध्द झालेले आहे. मागच्या महिन्यात झालेल्या सात पालिकांच्या निवडणुकीतही भाजपाला भरघोष यश प्राप्त झालेल आहे. त्यामुळे भाजपाला शहरातील जनतेचाही पाठींबा असून येणाऱया पाच पालिकांच्या निवडणुकीतही भाजपाला भरीव यश मिळेल अशी आपल्याला खात्री आहे. भाजपा गोव्यातील जनतेपर्यंत पोहाचलेला आहे असे त्यांनी सांगितले.
विकासासाठी भाजपालाच सहकार्य करा
गोवा मुक्तीच्या साठ वर्षांनिमित्त साधनसुविधांचा विकास करण्यात येणार आहे. मानवी विकासही होणार आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्वंयपूर्ण गोवा निर्माण करण्यासाठी सरकार झटत असून सर्व कुटुंबांसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. वास्कोत चौपदरी महामार्ग, कदंब स्थानक, मासळी मार्केट अशी काही विकास कामे अडून राहिलेली आहेत. ही विकास कामे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याला प्राध्यान्य दिले जाईल. विकासाला गती देण्यासाठी पालिका मंडळावरही भाजपाचे नगरसेवक निवडून यायला हवेत. त्यासाठी मुरगाव, वास्को व दाबोळी या तिन्ही मतदारसंघातील जनतेने भाजपा उमेदवारांना पाठींबा द्यावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
भाजपा आमदारांमधील मतभेद हे एका कुटुंबातील मतभेद, पालिकेत सत्ता भाजपाच स्थापन करेल- आमदार कार्लुस आल्मेदा आमदार कालुंस आल्मेदा यांनी यावेळी बोलताना वास्को, मुरगाव व दाबोळीत भाजपाचेच उमेदवार विजयी होणार असून तेच मुरगाव पालिकेत एकत्रीतरीत्या सत्ता स्थापन करतील. नेत्यांमध्ये काही मतभेद असल्यास ते एकाच कुटुंबातील आहे. असे मतभेद प्रत्येक कुटुंबात असतात असे ते म्हणाले. मुरगाव पालिका आर्थिक अडचणीत असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी या पालिकेला मदत करावी अशी मागणी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केली. वास्कोत पालिका इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरवात झालेली आहे. मासळी मार्केट आणि कदंब स्थानकाचेही काम आता सुरू होणार आहे. आरोप कुणीही करू शकतात. काम करणारी माणसे हवीत. माजी नगरसेवक दाजी साळकर यांनी आपल्यावर आरोप करण्यापेक्षा आपण त्यांच्यावर व पालिकेतील त्यांच्या सहकाऱयांवर केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे असे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले. माजी नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी मुरगाव पालिकेने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. किरण नाईक यांनी सुत्रसंचालन केले.