प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील शांतीनगर येथील महामार्गावर एका कारने तिघा पादचाऱयांना धडक दिली. या धडकेमुळे एक पादचारी जागीच ठार झाला तर दोघेजण जखमी झाले. ठार झालेल्या व्यक्तीचे नाव हुरीलाल जयस्वाल (44) असे आहे तर जखमींची नावे श्वेता पाटील व सुभाष पाटील अशी आहेत.
हा अपघात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शांतीनगरात घडला. मयत व्यक्ती व जखमी पादचारी या महामार्गावरून व्यायामासाठी चालत होते. यावेळी मांगोरहिलच्या दिशेने जाणाऱया एका मारूती कारने या पादचाऱयांना जोरदार धडक दिली. त्यात जयस्वाल हा ठार झाला. मयत नवेवाडेतील राहिवासी आहे. श्वेता पाटील व सुभाष पाटील जखमी झाले. जखमीसुध्दा नवेवाडेतील रहिवासी आहेत. त्यांना उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर कारचालक पॅक्शटन परेरा हा घटना स्थळावरून पसार झाला. मात्र, या अपघाताची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी त्याला शोधून काढले व त्याला अटक केली. कार चालकाचे नाव परेरा असे असून पोलिसांनी त्याची कारही ताब्यात घेतली आहे. वास्कोचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.