प्रतिनिधी/ वास्को
वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी मंगळवारी चिखली पंचायतीच्या हॉलमध्ये तालुक्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला आमदार कार्लुस आल्मेदा यांच्ंयासह मुरगावच्या उपनगराध्यक्ष रिमा सोनुर्लेकर, नगरसेवक दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, चिखलीचे सरपंच सॅबी परेरा, चिखली व सांकवाळचे काही पंच सदस्य व आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर, इतर शासकीय अधिकारीही उपस्थित होते.
या बैठकीत विविध भागातील कोरोनाविषयक स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच उपाययोजना विषयी चर्चाही झाली. विशेषता मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनविषयी चर्चा झाली. मुरगावचे नगरसेवक तसेच स्थानिक पंच सदस्यांनीही समस्या मांडल्या. या समस्या कशा पध्दतीने सोडवता येतील याविषयीही चर्चा झाली. बारावीचा निकाल झाला आता दहावीचाही निकाल लागणार असल्याने पालकांना व मुलांका शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्येही अशी मुले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. रेशनधान्य पुरवठा वगैरे सुरळीत करणे, रूग्णवाहिका सेवा इत्यादी प्रश्न या बैठकीत उपस्थित झाले. पंचायतमंत्र्यांनी यावेळी ज्या काही समस्या व अडचणी असतील त्या मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. सरकार कोरोनाविरूध्दच्या लढय़ासाठी बरेच काही करीत असून सरकारला लोकांचेही सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मांगोरहिलच्या कंटेनमेंट झोनमध्ये आता कोरोना बाधीतांची संख्या कमी होईल असा विश्वास व्यक्त केला. तेथील लोकांसाठी ऍण्टी बॉडी चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, मुरगावच्या हेडलॅण्ड सडय़ावर कोरोना बाधितांची संख्या 73 झाली आहे. बायणात 74 तर नवेवाडेत 61 कोरोना बाधित आढळून आले आहेत. झुआरीनगरात मंगळवारी संध्याकाळीपर्यंत 101 कोरोना बाधितांची नोंद झाली होती.