प्रतिनिधी/ वास्को
गोव्यात होऊ घातलेल्या रेल मार्गाचे दुपदरीकरण, अती दाबाच्या वीज वाहिन्यांचे काम तसेच गोव्यात कोळसा आयात करण्याचे नियोजन अशा प्रकल्पांना विरोध करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी वास्कोतील सेंट ऍड्रय़ू चर्चच्या प्रांगणात सभा घेण्यात आली. या सभेला विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत, आमदार आलॅक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार चर्चिल आलेमाव तसेच सत्ताधारी आमदार एलिना साल्ढाना यांनीही उपस्थित राहून या प्रकल्पांच्या विरोधात पाठींबा व्यक्त केला.
गोंयचो एकवोट या संघटनेने या सभेचे आायोजन केले होते. लोकही मोठय़ा संखेने उपस्थित होते. काँग्रेस नेते संकल्प आमोणकर, सैफुल्ला खान, मुरगावचे काही नगरसेवक, सेंट ऍड्रय़ू चर्चचे फादर गाब्रियाल कुतिन्हो, रूडॉल्फ फर्नांडिस, जवळपासच्या पंचायतींचे काही पंच सदस्य तसेच काही समाजसेवक या सभेला उपस्थित होते. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास या सभेची सांगता झाली. सभेत वक्त्यांनी एकमुखाने गोव्यात होऊ घातलेल्या नियोजित विकास प्रकल्पांना विरोध दर्शवला.
या सभेत डॉ. जॉर्सन फर्नांडिस, कॅप्टन वॅरियेतो फर्नांडिस, फादर बॉलमॅक्स परेरा, किस्तोद डिसोजा, ट्रीजन आंताव, जयेश शेटगावकर इत्यादींची भाषणे झाली. कॅप्टन वॅरियेतो फर्नांडिस यांनी गोव्यातील रेल मार्गाचे दुपदरी आणि त्याव्दारे गोव्यात मोठय़ा प्रमाणात भविष्यात होणारी कोळसा वाहतुक या विषयी माहिती दिली. कोळसा किती आणि कसा गोव्यात येणार, त्याची वाहतुक कशाप्रकारे होणार, रेलमार्ग दुपदरीकरण यामुळे होणारा वृक्षसंहार व पर्यावरणाचा नाश, समाज जीवनावर होणार दुष्परीणाम इत्यादी गोष्टींविषयी माहिती दिली. उर्वरीत सर्व वक्त्यांनी गोव्यातील नियोजीत प्रकल्प कसे घातक आहेत, ते गोव्यातील लोकांना का नको आहेत, त्याला का विरोध करायला हवा या विषयी माहिती देऊन सर्व लोकांनी नियोजित प्रकल्पांविरूध्द एकजुटीने पाठींबा द्यावा असे आवाहन केले.
या सभेनंतर प्रसिध्दी माध्यमांकडे बोलताना आमदार दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्षाने गोव्यातील नियोजित तिन्ही प्रकल्पांना विरोध करण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे स्पष्ट करून आपल्या पक्षाचा या प्रकल्पांना विरोध करणाऱया लोकांना पूर्ण पाठींबा राहणार असल्याचे सांगितले. रेल्वे दुपदरीकरण गोव्याच्या फायदय़ाचे नाही. हा प्रकल्प केवळ गोव्यात कोळसा आणण्यासाठीच असल्याचे ते म्हणाले. आमदार एलिना साल्ढाना यांनीही रेलमार्ग दुपदरीकरण, चौपदरी महामार्गाची उभारणी तसेच उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचा प्रकल्प या साऱयाविरूध्द लोकांनी एकत्र यायला हवी अशी मागणी केली. हे प्रकल्प गोव्याच्या हिताविरूध्द असल्यानेच आपण या प्रकल्पांना विरोध केलेला असल्याचे आमदार साल्ढाना म्हणाल्या.