वेतनाच्या मागणीसाठी कामगार संपावर
प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील वरूणापुरी ते मुरगाव बंदर दरम्यानच्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱया कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही. काल बुधवारपासून या कामगारांनी संप पुकारला आहे. मागच्या साडे चार महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. जोपर्यंत पूर्ण वेतन मिळत नाही तोपर्यंत काम करणार नसल्याचा निर्णय या कामगारांनी घेतला आहे.
वास्कोतील चौपदरी महामार्गाचे काम मागच्या सहा वर्षांपासून रखडत आहे. निधीची कमतरता हाच या रखडण्यामागील समस्या असून यापूर्वी वेळोवेळी गोव्याच्या मंत्री व मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही हा प्रश्न सुटलेलाच नाही. त्यामुळे गेली काही वर्षे या उड्डाण पुलाच्या माध्यमांतून बांधण्यात येत असलेल्या महामार्गाचे काम होऊ शकलेले नाही. या पुलाचे काम गॅमन इंडिया कंपनीकडून करण्यात येत आहे. मागच्या दोन तीन वर्षांपासून साधारण पन्नास कामगार किरकोळ कामे करून या पुलाचे काम पुढे रेटत असतात. परंतु त्यांनाही बऱयाच वेळा वेतन मिळत नाही. यापूर्वीही दोन ते तीन वेळा हे कामगार वेतनाच्या मागणीसाठी संपावर गेले होते. काल बुधवारी पुन्हा या कामगारांनी जे काही काम चालले होते तेही वेतनाच्या मागणीसाठी बंद ठेवले. मागच्या साडे चार महिन्यांपासून आम्हाला कंपनीने वेतन दिलेले नाही. सध्या जेवायला ख्यायलाही पैसा नाही अशी परिस्थिती कामगारांची झालेली असून आमचे संपूर्ण वेतन आम्हाला द्यावे अशी मागणी या कामगारांनी काम बंद ठेवताना केली. जोपर्यंत वेतन देण्यात येत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यात येणार नसल्याचे या कामगारांनी स्पष्ट केले आहे.