क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज एससी ईस्ट बंगालविरूद्ध हैदराबाद एफसी खेळ उंचावून विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. आज हा सामना वास्कोच्या टिळक मैदानावर होईल.
गुणतालिकेत शेवटून दुसऱया स्थानी असलेल्या ईस्ट बंगालविरूद्ध चौथ्या स्थानी असलेल्या हैदराबाद एफसीचे या सामन्यात पारडे जड वाटते. मात्र, मागील लढतीत एफसी गोवाला पराभूत करणाऱया ईस्ट बंगालचा आत्मविश्वास उंचावला आहे. 11 सामन्यांतून 17 गुणांनी पहिल्या चार संघात स्थान राखण्यात हैदराबाद एफसीला यश आले आहे. तरी त्यांना मागील तीन सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. शेवटच्या सामन्यात चेन्नईन एफसीविरूद्ध त्याना 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सूर गवसलेल्या ईस्ट बंगालविरूद्धची लढत त्यांच्यासाठी सोपी नाही.
ईस्ट बंगालचे नवीन प्रशिक्षक मारियो रिव्हेरा यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने विजयी सुरूवात केली आहे. हैदराबादविरूद्धही सातत्य राखू. जिंकल्यानंतर सरावातील वातावरणही बदलते. मागील सामन्यात विजय मिळविल्याने पुढचा सामना सोपा असेल असे नाही, मात्र, उंचावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर प्रत्येक खेळाडूकडून सांघिक कामगिरी उंचावेल, असे रिव्हेरा म्हणाले.
हैदराबादविरूद्ध त्यांचा स्टार बचावपटू आंतोनियो पॅरोसेविकचे पुनरागमन ईस्ट बंगालसाठी जमेची बाजू आहे. यंदा त्याने ईस्ट बंगालसाठी सर्वाधिक गोल केले आहेत. त्याचे कमबॅक आणि मार्सेलोही खेळणार असल्याने संघ मजबूत झालाय. मागील तीन सामन्यात विनलेस असल्याने ईस्ट बंगालला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक मॅनोलो मार्केझ म्हणाले.
ताज्या गुणतालिकेत चौथे स्थान असले तरी जवळपास सात संघ पहिल्या चार संघांत स्थान मिळविण्यासाठी झुंजत आहेत. मागील काही सामन्यांतून बोध घेत आम्हाला खेळ उंचवावा लागेल. गुणतालिकेत तळाला असला तरी प्रतिस्पर्धी संघाकडे दुर्लक्ष करणार नाही असे हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक मार्केझ म्हणाले. पहिल्या टप्प्यात उभय संघातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता व त्यामुळे दुसऱया लढतीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.