क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज गुरूवारी हैदराबाद एफसीसमोर ओडिशा एफसीचे आव्हान आहे. या लढतीत आठव्या हंगामात सर्वाधिक गोल करणारा नायजेरियाचा स्टार फुटबॉलपटू बार्थोलॉमियाँव ऑग्बेचे केंद्रस्थानी आहे. हैदराबाद एफसीने 12 सामन्यांतून 20 गुणांसह अव्वल स्थान राखले आहे.
मागील लढतीत तळातील ईस्ट बंगालवर 4-0 अशी मोठय़ा फरकाने मात करताना हैदराबाद एफसीने आपली तीन विनलेस सामन्यांची मालिका खंडित केली. बुधवारच्या सामन्यात चेन्नईन एफसीने बेंगलोर एफसीवर विजय मिळवला तर हैदराबाद एफसीचे स्थान अबाधित राहणार नाही. वास्कोच्या टिळक मैदानावर आज हा सामना होईल.
ईस्ट बंगालवरील मोठय़ा विजयात बार्थोलॉमियाँव ऑग्बेचे याची हॅट्ट्रिक निर्णायक ठरली. या विजयाने हैदराबाद एफसीचे अव्वल स्थान कायम राहिले. शिवाय ऑग्बेचे याची आठव्या हंगामातील वैयक्तिक गोलसंख्या बारावर गेली. त्यामुळे जबरदसत खेळणाऱया या स्टार खेळाडूने सर्वाधिक गोलांसाठी दिल्या जाणाऱया ‘गोल्डन बूट‘साठी प्रबळ दावेदारी पेश केली आहे. या विक्रमासह आयएसएलमधील गोलांचे अर्धशतकही त्याच्या आवाक्यात आहे. त्याच्या नावावर आजवर 48 गोलांची नोंद आहे.
ओडिशा एफसीची मागील चार सामन्यांतील कामगिरी संमिश्र आहे. दोन विजय मिळवताना एक बरोबरीसह केरळ ब्लास्टर्सविरूद्धच्या पराभवाचा समावेश आहे. ओडिशा एफसीचे डझनभर सामन्यांतून 17 गुण आहेत. आणखी एक विजय मिळवल्यास ते हैदराबाद एफसीच्या अव्वल स्थानाला आव्हान देऊ शकतील. मात्र, मागील सामन्यात त्यांना त्याच्यापेक्षा खालचे स्थान असलेल्या एटीके मोहन बागानविरूद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले. हैदराबादविरूद्ध फॉर्मात असलेल्या बार्थोलॉमियाँव ऑग्बेचेसमोर ओडिशा एफसीची कसोटी लागेल.
आक्रमक खेळासाठी हैदराबाद एफसी प्रसिद्ध आहे. त्यांचे प्रशिक्षकही अनुभवी आहेत. मात्र, आम्ही आमची बलस्थाने वापरून प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणखी एक विजय आमचे गुणतालिकेतील स्थान तसेच आत्मविश्वास उंचावणारा ठरेल, ओडिशा एफसीचे प्रशिक्षक किनो गार्सिया यांनी म्हटले आहे.
12 सामन्यांत केवळ दोन पराभव पाहिल्याने हैदराबाद एफसीचे प्ले-ऑफ फेरीतील स्थान निश्चित वाटते. ओडिशा एफसीविरूद्ध सातत्य राखताना पूर्ण तीन गुण वसूल करू, असे त्यांचे प्रमुख प्रशिक्षक मान्यूएल मार्केझ यांना वाटते. एससी ईस्ट बंगालविरूद्धच्या सामन्यात त्यांचा केवळ बार्थोलॉमियाँव ऑग्बेचे चमकला नाही तर बचावफळीनेही सुरेख खेळ केला. त्याच्या समवेत अकिकेत जाधव व आशिष राय यानीही आपली जबरदस्त छाप पाडली. पहिल्या टप्प्यात हैदराबाद एफसीने ओडिशा एफसीचा 6-1 असा धुव्वा उडविला होता. सध्याचे अव्वल स्थान पाहता हैदराबादचे पारडे जड आहे. मात्र, पहिल्या सात संघांचे गुण पाहिल्यास केवळ एक-दोन गुणांचा फरक आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चूक करणार नाही, असे हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक मार्केझ म्हणाले.