प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरात सोमवारी संध्याकाळी कार्निव्हल चित्ररथ मिरवणुक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. स्वतंत्रपथ मार्गाच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी या मिरवणुकीतील चित्ररथांचा आस्वाद घेतला. या मिरवणुकीत मोठय़ा संख्येने पथके सहभागी झाली होती. प्रमुख पाहुण्या जिल्हाधिकारी रूचिका कटीयाल यांनी वास्को कार्निव्हल उत्सव समितीचे अध्यक्ष जयंत तारी, समितीचे सरचिटणीस फ्रान्सिस्को रॉड्रिग्सस, खजिनदार दिनीज डिमेलो व समितीचे इतर पदाधिकारी, तियात्र अकादमीचे अध्यक्ष मिनीनो फर्नांडिस, कोंकणी चित्रपट कलाकार जॉन डिसील्वा व मान्यवरांच्या उपस्थितीत बावटा दाखवून कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ केला.
कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीला वर्षपध्दतीप्रमाणे वास्कोतील सेंट ऍण्ड्रय़ू चर्चसमोरील हुतात्मा चौकातून सुरूवात झाली. संपूर्ण गोव्यातील पथकांचा या मिरवणुकीत समावेश होता. गोव्यातील परंपरेवर आधारीत विविध चित्ररथ सहभागी झाले होते. स्वतंत्र पथ मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हजारो नागरिकांनी या मिरवणुकीचा आस्वाद घेतला.
जोशी चौकात उभारलेल्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या जिल्हाधिकारी रूचिका कटीयाल, मुरगांवचे मुख्याधिकारी व वास्को कार्निव्हल उत्सव समितीचे अध्यक्ष जयंत तारी, समितीचे इतर पदाधिकारी, किंग मोमो व क्वीन मोमो उपस्थित होते. कार्निव्हल चित्ररथ मिरवणुक शांततेत व उत्साहात पार पडली. मिरवणुकीत भारतीय नौदलाचे चित्ररथही सहभागी झाले होते.
चित्ररथ मिरवणुकीला नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला. चित्ररथ मिरवणुकीनंतर सायंकाळी पालिका इमारतीसमोर पॉपस्टार एल्वीस गोयस यांचा ‘केपेची किरणा’ लाईव्ह कार्यक्रम पार पडला.
आज मंगळवार दि. 1 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वा. पालिका इमारतीसमोर स्थानिक कलाकारांचा नृत्याचा कार्यक्रम, 7 वा. ‘ओ लुव’ कोंकणी संगीताचा कार्यक्रम, तद्नंतर रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत बॅण्ड व ब्लॅक स्लेडस् कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल