प्रतिनिधी / वास्को
वास्को शहरातील कुलासो बिल्डींगमधील जे. एम. बक्षी व युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या कार्यालयात चोरी करून अज्ञात चोरटय़ांनी लाखभराची रोख लंपास केली. ही चोरी रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी पहाटे झाली असण्याची शक्यता आहे.
वास्को शहरातील स्वतंत्रपथ मार्गावरील कुलासो बिल्डींग शहराच्या मध्यभागी असून या इमारतीत तळ मजल्यावर बॅक ऑफ इंडियाची शाखा आहे. या इमारतीतील दुसऱया मजल्यावरील जे. एम. बक्षी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स या आस्थापनांचे मुख्य दरवाजे फोडून चोरांनी आत प्रवेश केला व आतील कपाटातील दोन्ही कंपन्यांचे मिळून नव्वद हजारांची रोख रक्कम लंपास केली. सकाळी कार्यालय उघडण्याच्या वेळी ही चोरी उघडकीस आली. त्यामुळे दोन्ही आस्थापनांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली. वास्को पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.