प्रतिनिधी /वास्को
मुलांना पळवणाऱया टोळीतील असल्याच्या गैरसमजाने वास्कोत मंगळवारी संध्याकाळी बेदम मारहाण झाली. हा प्रकार वास्को पोलिसांनी गांभिर्याने घेतलेला असून या मारहाणीत गुंतलेल्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मारहाण करणाऱया जमावातील काहींची ओळख पटलेली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मंगळवारी संध्याकाळी वास्कोतील टी.बी. कुन्हा चौकात मुलांना पळवणारा असल्याच्या संशयाने जमावाने मनोरूग्णाला बेदम मारहाण करण्याचा घडलेला प्रकार चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेला आहे. ज्या आवेषाने त्या जमावातील युवकांनी मनोरूग्णाला लाथांनी तुडवले आणि लाठीनेही हाणलेले पाहता, पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले नसते तर कदाचित त्या मनोरूग्णाचा जीवही गेला असता. रस्त्यावर पाडून करण्यात आलेल्या या मारहाणीचा व्हिडीयो वायरल झाल्याने मारहाण करणाऱयांचा अमानुषपणाही उघड झालेला आहे. कोणतीही चौकशी किंवा खातरजमा न करताच केवळ संशयाने मनोरूग्णाचा जीव घेण्याचा जमावाने केलेला प्रयत्न संतापजनक ठरलेला आहे. संशयीताला पकडून पोलिसांच्या ताब्यात न देता जमावाने कायदा हातात घेतल्याने पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. मनोरूग्णाला नाहक मारहाण करण्यात गुंतलेल्या काही युवकांची ओळख पटलेली असून पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्य काहींचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, जमावाने मारहाण केलेली ती मनोरूग्ण व्यक्ती पोंडीचेरी राज्यातील असून त्याचे नाव डेन ज्योन्स असे आहे. त्याला पोलिसांनी बांबोळीतील मनोरूग्णालयात दाखल केले आहे. लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊन घाबरून जाऊ नये. तसेच तणाव निर्माण करू नये. संशयास्पद काही आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी केले आहे.