प्रतिनिधी / वास्को
वास्को शांतीनगर येथील महामार्गावर धावती स्कॉरपीयो गाडी रस्त्यावर उलटून अपघात होण्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या गाडीच्या धडकेने वीज खांब रस्त्यावर आडवा झाला. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातात सापडलेली स्कॉरपीयो (जीए 07, ई 1935) दाबोळी विमानतळाच्या विरूध्द दिशेने मांगोरहिल वरूणापुरी या भागाकडे जात होती. शांतीनगर येथील एका वळणाजवळ ही जीप अचानक उलटली. चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने हा अपघात घडला. मात्र, कुणीही जखमी झाला नाही. वाहनाची मात्र, हानी झाली. तसेच उलटलेल्या कारची धड वीज खांबाला बसल्याने हा खांब रस्त्यावर आडवा झाला. रस्त्याच्या बाजुला पार्क केलेली एक कारही थोडक्यात वाचली. अन्यथा तीचेही नुकसान झाले असते. वास्को पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. संचारबंदी असताना सदर चालक कुठे जात होता, बेदरकारपणे वाहन चालवण्याचे कारण काय याची चौकशी करून सदर चालकाविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, वास्को व परीसरात गेल्या चार दिवसांत वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढलेली असून काही युवक नाहक वाहने घेऊन येरझाऱया घालीत असतात. किरकोळ अपघातांच्याही घटना संचारबंदी असताना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही जण वाहने अडवणाऱया पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत असून पोलिसांनी कडक कारवाई हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.